Monday, April 6, 2026

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली. सुनेत्राताईंना सर्वच पक्षांनी पाठिंबा देऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोटनिवडणुकीच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "बारामती पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा द्यावा, अशी माझी विनंती आहे. ही निवडणूक बिनविरोध होणे महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे ठरेल. यापूर्वीही आपण अशा निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक भाजपने न लढण्याचा निर्णय घेतला होता. तोच मोठेपणा आताही सर्व पक्षांनी दाखवावा."

रस्त्यांलगतच्या विहिरींचे 'ऑडिट' होणार

नाशिकमधील दिंडोरी येथे झालेला अपघाताविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "दिंडोरीची घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी आहे. भिंत मोठी असती तर कदाचित जीव वाचू शकले असते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या विहिरी जिथे कुठे असतील, तिथे तत्काळ उपाययोजना कराव्यात. जर संरक्षक भिंतीची उंची वाढवणे आवश्यक असेल, तर ते काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाला तातडीची मदत घोषित करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >