मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४०० दशलक्ष लीटरपर्यंतच्या विस्तारित क्षमतेसह बांधण्यात येणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्यांसह काम त्वरेने हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्यात यावे. तसेच स्थायी समितीने नुकत्याच मंजूर केलेल्या गारगाई प्रकल्पासाठी, राहिलेल्या परवानग्यांसाठी पाठपुरावा करून मुंबईकरांची सध्याच्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व ती पावले उचलावीत, असेही निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले
मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी विविध विभागांचा आढावा घेतला. यामध्ये मालमत्ता, वित्त, पाणीपुरवठा प्रकल्प आणि माहिती तंत्रज्ञान विभागांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. नागरिकांना विविध नागरी सुविधा कमीत कमी वेळेत, अधिक चांगल्या पद्धतीने कशा पुरविता येतील, यावर महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी भर दिला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, सहायक आयुक्त (मालमत्ता) पृथ्वीराज चव्हाण, प्रमुख लेखापाल (वित्त) अरूण जाधव, प्रमुख अभियंता (प्रभारी) (पाणीपुरवठा प्रकल्प) वनाथ घाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभाग अंतर्गत सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या व हाती घेतलेल्या प्रकल्पांचा महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी आढावा घेतला. पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अमर महाल ते परळ आणि अमर महाल ते ट्रॉम्बे या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या जलबोगद्यांची माहिती देण्यात आली. हे जलबोगदे मुंबई शहर व पूर्व उपनगर विभागासाठी फायदेशीर आहेत. त्याचबरोबर नव्याने हाती घेण्यात आलेल्या येवळी ते कशेळी, तसेच कशेळी ते मुलुंड या जलबोगद्यांची कामे त्वरित करण्यात यावीत, असे त्यांनी निर्देश दिले.
मुंबईच्या मलनिःसारण व्यवस्थेसाठी मुंबईत कुलाबा, वरळी, वांद्रे, वेसावे (वर्सोवा), मालाड, भांडुप आणि घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रकल्प उभारण्यात येत आहेत. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कसे कार्यान्वित होतील, याकडे लक्ष पुरवण्याबाबत आयुक्तांनी लक्ष वेधले.
भांडूप येथे पाणीपुरवठा विभागाद्वारे हाती घेण्यात आलेला, आशिया खंडातील सर्वात मोठा २ हजार दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत दिवसनिहाय नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जेणेकरून प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होईल.
मुंबईची वाढती लोकसंख्या व त्यानुरूप विकासाची गरज लक्षात घेऊन, मुंबईकरांसाठी आवश्यक भविष्यकालीन पाण्याची गरज लक्षात घेता अन्य शाश्वत स्रोतांचा विकास करण्यास देखील प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी नमूद केले.