मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास खलबते झाली. पार्थ पवार यांची नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ही केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, याबाबत आता तर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पार्थ पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आणि पक्षाची जबाबदारी पेलताना पार्थ पवार सातत्याने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.