- २९ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम अर्ज करता येणार
मुंबई : मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने २०२६ सालातील घरांच्या लॉटरीची घोषणा केली असून, तब्बल २६४० सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ-सिद्धार्थ नगर (गोरेगाव), गोराई व मागाठाणे (बोरीवली), सुभाष नगर (चेंबूर), गांधीनगर (वांद्रे), पंतनगर (घाटकोपर), गिरगाव, वडाळा, दादर, माझगाव, पवई आदी भागांतील प्रकल्पांचा या सोडतीत समावेश आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच सोमवार ३० मार्च २०२६ दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२६ रात्री ११:५९ पर्यंत आहे. तर अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अंतिम सोडत १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या सोडतीत विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका विक्रीसाठी आहेत.
अर्जदारांसाठी मोबाइल अॅप तसेच अधिकृत वेबसाइटवर अर्ज नोंदणी व पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणार आहे.
दरम्यान, अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन म्हाडा (MHADA) कडून करण्यात आले आहे.मुंबईतील विविध भागांमध्ये घर मिळवण्याची ही मोठी संधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
सदनिका सोडत प्रक्रियेसाठी अर्ज कुठे भरता येणार?
म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
उत्पन्न गटनिहाय सदनिका :
या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.