मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूनं एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली.
नवा उच्चांक गाठणाऱ्या अटल सेतूचे १३ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्यापासून, या पुलावर २ कोटींहून अधिक वाहनांच्या प्रवासाची नोंद झाली आहे. वाहनांच्या नोंदणीनुसार २७ मार्च २०२६ रोजी २,००,००,३१६ व्या वाहनाने अटल सेतूवरून प्रवास केला आहे. हा क्षण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रत्येक प्रवासी, प्रत्येक कुटुंबासाठी विशेष आहे. या माध्यमातून नवीन जीवनवाहिनीनं क्रांती घडवून आणली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.
अटल सेतूवरून २६ महिन्यांत...
- १,८१,९५,७१८ खाजगी वाहनांची पुलावरून वाहतूक. हा आकडा एकूण वाहतुकीच्या ९१% पेक्षा अधिक आहे.
- ५,९८,५२५ लघु व्यावसायिक वाहनं, मिनीबस, बस आणि ट्रकची पुलावरून वाहतूक.
- १२,०६,०७३ मध्यम, जड आणि अति-अवजड वाहनांच्या वाहतुकीची नोंद.
दुर्गम भाग ते मुख्य शहर, अवघ्या काही मिनिटांत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील चिरले या गावाशी जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ तासाभरावरून अवघ्या २० मिनिटांवर आला आहे. केवळ दोन वर्षांत या सेतूनं फक्त दळणवळणाची परिभाषा बदलली नाही, तर अर्थव्यवस्थेलाही गती दिली आहे. व्यापार वाढवणं, इंधनाचा खर्च कमी करणं, प्रवास सुलभ करणं आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे नवे मानक प्रस्थापित करणं हे या पुलानं साध्य केलं आहे.
अटल सेतू हा केवळ एक पूल नाही, तर ती मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. पुलावरून २ कोटी वाहनांनी प्रवास केल्यानंतर हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा महाराष्ट्र काही घडवतो त्यात गतिमान भविष्याची झलक पाहायला मिळते, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.
अटल सेतूचे फायदे
अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे, जो दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा-शेवाशी जोडतो. हा सहा मार्गिकांचा पूल आहे. शिवडी (मुंबई) ते न्हावा-शेवा (नवी मुंबई/चिर्ले) पर्यंतच्या भागाला जोडणारा हा पूल एकूण २१.८ किमी लांबीचा आहे. पुलाचा १६.५ किमीचा भाग समुद्रावर आणि ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. हा पूल दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटी (JNPT) बंदराला एकमेकांशी जोडतो. फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यात अटल सेतू एका प्रमुख सहाय्यकाची भूमिका बजावतो.