मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. "अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या सर्वांची एचआयव्ही टेस्ट करा", असं खळबळजनक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.अशातच बिग बॉस फेम आणि सामजिक कार्यकर्ते अनिल थत्ते यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. थत्ते यांनी व्हिडीओच्या माध्यमातून खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले अनिल थत्ते?
अनिल थत्ते यांनी @bigboss_anilthatte या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, "सत्यानाश..पोलिसांकडून जो काही तपास चालू आहे. त्यात भयानक भयानक असा मेडिकल रिपोर्ट आला आहे. काही चॅनल्स आणि यूट्यूबवाल्यांनी तो कोट केला आहे. पण त्याच्या रिपरकेशनबद्दल कोणीच बोललं नाही. नुसतंच एवढच दिलंय की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आलाय. आता त्याची ख्याती होती अपत्य प्राप्ती साठी तो जे काही करतो ते करतो..सरकारी यंत्रणाच दावा असं करतायत की हजार बायका अपत्य प्राप्तीच्या प्रकरणात पीडित आहेत. याला एचआयव्ही असेल, तर हजार एक बायकांना एचआयव्ही होऊ शकतो. त्यांच्या पोरांना, नवऱ्याला होऊ शकतो. हजार संसार संकटात आले, त्याची चर्चा करा".
'तो पेन ड्राईव्ह समोर का येत नाही?'
'अशोक खरातचं लॅपटॉप आणि साहित्य जप्त केलं असेल, तर मग पेन ड्राईव्ह समोर का आणला जात नाही? तो जर समोर आला, तर मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्र्यांची विकेट जाईल',असं मोठं विधानही वडेट्टीवार यांनी केलं होतं. दरम्यान, अशोक खरातच्या शिक्षणाचा बायोडेटाही नुकताच समोर आला आहे. खरातला दहावीच्या परीक्षेत गणितात २८ गुण, मराठीत ३९ गुण, इंग्रजीत ३७ गुण, विज्ञानात ६२ गुण, समाजशास्त्र ३८ गुण, हिंदीत ४७ गुण मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.