- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची मंजुळा'चं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये दिसत असणारे डोळे
आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला रहस्यमय काळा पोपट याबाबतची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
नुकताच होळीच्या मुहूर्तावर या सिनेमाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यामध्ये एका दारावर काहीजणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
यातील डोळे कोणाचे आहेत? तसेच हे कलाकार कोण आहेत? या काळ्या पोपटाचे रहस्य काय? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओजच्या वतीने उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली असून विविध कोरगांवकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच, लवकरच म्हणजेच येत्या ५ जून २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.