मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत. येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरंजनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दणक्यात साजरं केलं जातं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून ‘चिरायू’ सतत वेगळा आणि सकारात्मक संदेश देत असते. तसेच नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते.


यंदा चिरायू च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये बियांचा वापर करत ही गुढी तयार करण्यात आली. उभारलेली ही ‘बीज गुढी’ केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याची प्रेरणा देणारी ठरली. या बियांमधून भविष्यात झाडे उगवून हरित पर्यावरण घडवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. परंपरा आणि पर्यावरण यांची सांगड घालत हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला.२००६ पासून ‘शेलार मामा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा सन्मान सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे.


मराठी कलाक्षेत्र हे प्रयोगशीलतेसोबतच समाजाभिमुखतेसाठीही ओळखले जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत ‘चिरायू’ उपक्रम राबवला जातो. यंदा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्याबद्दल अभिनेता सुयश टिळक याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पडद्यामागील कलाकारांमध्ये वेशभूषेसाठी राहुली नागरे, चित्रपट पोस्टर डिझायनिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सचिन गुरव, तर चित्रपट प्रसिद्धी-जनसंपर्क क्षेत्रातील कार्याबद्दल गणेश गारगोटे यांचा सन्मान करण्यात आला. त्यासोबत मेकअप आर्टिस्ट संतोष गिलबिले, आणि डबिंग आर्टिस्ट अभिनेता मंगेश सातपुते यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. अमृता राव, सुजय डहाके, भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, कबीर खंदारे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्या मान्यवरांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला.


या सोहळ्यात ‘शेलार मामा फाउंडेशन’चे सुशांत शेलार यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम , सर्व मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानत संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. “समाजासाठी आणि कलेसाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे, हा आमचा खरा हेतू आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या जीवनात खरी समृद्धी येते. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे आणि सुगीचे दिवस येऊ दे,’ अशी भावनाही सुशांत शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.


दिग्दर्शक संजय जाधव, सचित पाटील, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, दिग्दर्शक समित कक्कड,श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, योगेश शिरसाट, जान्हवी किल्लेदार, राधा सागर, निर्मात्या अमृता राव, रणजित जोग, अक्षया गुरव, अक्षता नाईक, संजना पाटील, मंगेश सातपुते, संगीतकार अजित परब, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, गीतकार मंदार चोळकर आदि कलाकार यावेळी उपस्थित होते.


कला, संस्कृती, समाजसेवा यांचा गौरव करणारा आणि मान्यवरांची उपस्थिती, कलाकारांचा उत्साह, रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘चिरायू २०२६’ सोहळा अविस्मरणीय ठरला.

Comments
Add Comment

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या