- मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा
- प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाऱ्हाणे घालून फोडला नारळ
- वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाडमध्ये रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा
मुंबई : कोकणच्या लाल मातीचे आणि अथांग अरबी समुद्राचे नाते अधिक दृढ करणाऱ्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा रविवारी, १ मार्च रोजी, भव्य शुभारंभ झाला. अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा मुंबई आणि कोकण यांना समुद्रमार्गाने जोडणाऱ्या या सेवेच्या प्रारंभामुळे कोकणच्या सागरी विकासाला नवी गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्षात उतरलेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ मुंबईतील ऐतिहासिक भाऊचा धक्का येथे पार पडला. रविवारी मंत्री राणे यांच्या हस्ते देवपूजा करून आणि गाऱ्हाणे घालून नारळ फोडत पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या वेळी मुंबईकर चाकरमानी आणि पर्यटकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.
एकेकाळी ‘स्टीमर’च्या माध्यमातून गजबजणारी ही जलवाहतूक एका दुर्दैवी अपघातानंतर खंडित झाली होती. रस्ते वाहतुकीतील अडचणी आणि रेल्वे आरक्षणातील प्रतीक्षा लक्षात घेता, जलमार्ग हा सक्षम पर्याय ठरू शकतो, या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या सेवेसाठी ‘एम२एम प्रिन्सेस’ हे आधुनिक जहाज कार्यरत राहणार आहे. सुमारे ६२० ते ६२५ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या जहाजात एकाच वेळी चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहने नेण्याची सुविधा आहे. अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग गाठता येणार असून प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली, आवश्यक सुरक्षा उपकरणे आणि बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाडमध्ये रो-रो सेवा सुरू करणार - मंत्री नितेश राणे
उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "ही सेवा आगामी काळात वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाड अशा विविध ठिकाणी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जलवाहतुकीचा सक्षम पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राणे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मुंबई-कोकण जलवाहतुकीची संकल्पना मांडली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य परवानग्या मिळवणे सुलभ झाले. आज ही सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि पर्यटनवाढ निश्चितपणे साध्य होईल. "कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आदरणीय नारायण राणे साहेबांनी पाहिले आणि सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणाला जगाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रदेशाच्या प्रगतीला नवे आयाम मिळाले. आज मंत्री म्हणून त्यांच्या त्या स्वप्नपूर्तीत हातभार लावण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, ही केवळ सुरुवात आहे; पुढील काळात कोकणाच्या विकासासाठी अजून अनेक उपक्रम राबवायचे आहेत आणि प्रगतीची नवी क्षितिजे गाठायची आहेत. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कामाच्या ओघात काही चुका झाल्या तर त्या मान्य करून सुधारण्याची आमची पूर्ण तयारी आहे. कोकणच्या जनतेने या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा," असे आवाहन त्यांनी केले
वेळापत्रक
मुंबईहून दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८.०० वाजता प्रस्थान होणार असून विजयदुर्गहून दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी १२.०० वाजता फेरी सुटणार आहे.
तिकीट दर
- इकॉनॉमी – ३,००० रुपये
- प्रीमियम इकॉनॉमी – ५,००० रुपये
- बिझनेस – ७,००० रुपये
- फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
वाहनांसाठी शुल्क (कार)
- एक्सएल – ९,००० रुपये
- एल – ८,००० रुपये
- एम – ७,००० रुपये
- एस – ६,००० रुपये
- दुचाकी – १,००० रुपये
- सायकल – ६०० रुपये