खारघर : “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धर्माचा सन्मान, समाजाची एकजूट आणि राष्ट्रीय एकात्मता हीच खरी ताकद असल्याचे अधोरेखित केले. हा समागम सोहळा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या भव्य समागम सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदरणीय बाबा हरिनाम सिंग जी, धर्मगुरु बाबू सिंग जी महाराज, महंत रघुमणीजी, मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक, संजय राठोड, नितेश राणे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर आणि इतर प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शीख बांधव-भगिनींनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “आज आपण नववे शीख गुरु, हिंद-दी-चादर गुरु तेग बहादुर साहेब यांच्या ३५०व्या शहीद दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ शीख इतिहासाचा नाही, तर संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील गौरवाचा दिवस आहे.” १७व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीत धार्मिक अत्याचार वाढले. काश्मिरी पंडितांवर जबरदस्ती धर्मांतराचे संकट ओढवले असताना त्यांनी गुरु साहेबांकडे मदतीसाठी धाव घेतली. “मी माझा धर्म सोडणार नाही आणि कोणालाही त्याचा धर्म सोडू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत गुरु तेग बहादुर यांनी दिल्लीच्या चांदणी चौकात शिरच्छेद स्वीकारला; पण अन्यायासमोर झुकले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. “त्यांच्याकडे सेना नव्हती, ताज नव्हता, खजिना नव्हता; पण अपार साहस, अढळ सत्य आणि असीम करुणा होती. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हटले जाते जी चादर वादळांपासून संरक्षण करते, थंड रात्रीत उब देते आणि दुर्बलांना बळ देते,” असे ते म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, “गुरुजी असम आणि बंगालच्या दौर्यावर असताना एका निर्दयी जमीनदाराने गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला. गुरु तेग बहादुरजींनी कोणतेही शस्त्र न वापरता सत्य आणि शांततेच्या बळावर त्याला जाब विचारला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सामर्थ्यामुळे जमीनदार झुकला आणि शेतकऱ्यांची जमीन परत केली. यावरून सिद्ध होते की खरी ताकद बंदुकीत नसून सत्य आणि न्यायाच्या आवाजात असते.” “गुरुजींचे विचार जन-जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे. ६००० हून अधिक गावांमध्ये डिजिटल रथांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. सिख, बंजारा, वाल्मीकी, लबाना आणि सिकलीगर समाजांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य सुरू आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध अधोरेखित करत शिंदे म्हणाले, “नांदेड ही भूमी शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांची कर्मभूमी आहे. याच पवित्र स्थळी त्यांनी ‘सब सिखन को हुकुम है, गुरु मान्यो ग्रंथ’ असा संदेश दिला. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवली.” पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराजांच्या ७५५व्या प्रकाशोत्सवानिमित्त ‘संत नामदेव महाराष्ट्र सदन’चे भूमिपूजन करण्याचा अनुभव सांगताना शिंदे म्हणाले, “तेथे ग्रामस्थांनी दिलेला ‘बाबा नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. घुमानला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकद लावेल.”
शिंदे म्हणाले, “१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शीख समाजाच्या संरक्षणासाठी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले होते. महाराष्ट्राने नेहमीच बंधुभाव जपला आहे.” भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपण आपली श्रद्धा कधीही कमकुवत होऊ देणार नाही. कोणाच्याही धर्मावर किंवा ओळखीवर हल्ला सहन करणार नाही. एकमेकांचे संरक्षण करू, जसे हिंद-दी-चादरने संपूर्ण हिंदुस्थानाचे रक्षण केले.