'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...!'

अजित पवारांच्या शोकसभेत दिग्गज भावुक; राजकीय क्षितीजावरचा धगधगता सूर्य मावळ्याची भावना


मुंबई : वरळीचा एनएससीआय डोम सोमवारी तुडुंब भरला होता. पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्र आलेल्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यांतील ओलावा बरेच काही सांगून जात होता. प्रशासनावर असलेली घट्ट पकड, पहाटे ५ पासून कामाला लागण्याची शिस्त, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत उमटवलेला आपला अमीट ठसा... अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा, एका 'लोकनेत्या'चा अस्त झाल्याची भावना सर्वांच्याच मुखी होती. राजकीय क्षितिजावरचा एक धगधगता सूर्य मावळल्याची जाणीव कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जात होती. "दादा, तुमचा निर्णय चुकला, माघारी या...!" असा हुंदका देताना केवळ राजकीयच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक 'आधारवड' कोसळल्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचीच ही साक्ष होती.


निमित्त होते महाराष्ट्राचे लाडके 'दादा' अर्थात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचे. या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अशोक हिंदुजा आणि अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफदेखील आवर्जून उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अजितदादांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहण्याची वेळ येईल, अशी साधी कल्पनाही कधी माझ्या मनाला शिवली नव्हती. एखादे राज्य घडत असते तेव्हा ते एका व्यक्तीने घडत नाही, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे नेतृत्व त्यात आपला ठसा उमटवत असते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल, त्यात अजितदादा यांचे नाव प्रामुख्या ने घेतले जाईल. लोकनेता, जननेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रश्न आहेत, कोणते नेतृत्व प्रभावी आहे, त्या भागाची नाडी, याची अचूक जाण दादांना होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माहिती त्यांना असायची. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजाकडे वाटचाल करत होते, संघर्षातून स्थैर्याकडे त्यांचा प्रवास सुरू होता आणि नेमके त्याचवेळी त्यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे अत्यंत वेदनादायी आणि विश्वास न बसणारे आहे. हा आघात केवळ पवार कुटुंबापुरता मर्यादित नाही, त्यांच्या आधाराने उभे राहिलेले अनेक नेते, कार्यकर्ते आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.


तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही तिघे (मी, देवेंद्रजी आणि दादा) २४/७ काम करायचो. दादा पहाटे कामाला लागायचे, देवेंद्रजी दिवसभर आणि मी रात्रभर. आज महाराष्ट्र एका कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला आहे. नशिबाने साथ दिली असती तर दादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देण्याचे कसब फक्त दादांकडेच होते, असेही त्यांनी नमूद केले.


शरद पवारांचा हुकमी एक्का हरपला - जयंत पाटील


आमदार जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबतच्या १९९१ पासूनच्या प्रवासाला उजाळा दिला. "अजितदादा आणि मी सभागृहात कायम शेजारी असायचो. मी गमतीने म्हणायचो की राजकारणात आधी आबा, मग तुम्ही आणि मग मी. पण आबांनंतर दादा असे मध्येच सोडून जातील असं वाटलं नव्हतं. आजही ते शरद पवारांचा सर्वात मोठा 'हुकमी एक्का' होते," असे पाटील यांनी सांगितले. राजकारणात पुन्हा एकसंधपणे काम करण्याचे दादांचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


नाना पाटेकर झाले भावुक


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दादांसोबतच्या ५० वर्षांच्या मैत्रीचा पट उलगडला. "मी २५ वर्षांचा आणि दादा १८ वर्षांचे होते तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. आज दादांचा ७५ वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो तर जास्त बरं वाटलं असतं," असे म्हणत नानांनी जड अंतःकरणाने दादांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग