मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा व भारताचे दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी दोन्ही अंतराळवीरांना प्रश्न विचारून अंतराळ आणि अंतराळ मोहिमेबाबतची माहिती जाणून घेतली. दोन्ही अंतराळवीरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतातील पहिल्या 'मुंबई क्लायमेट वीक'चे आयोजन १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वांद्रे येथील 'जिओ वर्ड कन्व्हेन्शन सेंटर' येथे करण्यात आले होते. याप्रसंगी भारतासह जगातील विविध ३५ देशांमधील पर्यावरण अभ्यासक आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये हवामान बदलांवरील उपाययोजनांवर आणि पर्यावरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याच परिषदेदरम्यान 'सारे जहाँ से अच्छा' या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सत्रात अंतराळवीर राकेश शर्मा व सुधांशु शुक्ला या दोन्ही अंतराळवीरांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी संवाद साधला. या दरम्यान विद्यार्थ्यांनी विचारेल्या कल्पक प्रश्नांना दोन्ही मान्यवरांनी समर्पक अशी उत्तरे दिली.
या परिसंवादामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सत्रात विद्यार्थ्यांनी दोन्ही अंतराळवीरांना प्रश्न विचारून अंतराळ आणि अंतराळ मोहिमेबाबतची माहिती जाणून घेतली. दोन्ही अंतराळवीरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माणूस अंतराळात तरंगतो
'अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांच्या शरीरात कशाप्रकारे बदल होतात?', या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचे पहिले आंतराळवीर राकेश शर्मा यांनी सांगितले की, अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षण असते. त्यामुळे अंतराळात माणसाच्या शरीरात विशिष्ट बदल होतात आणि माणूस अंतराळात तरंगतो. अंतराळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करूनच चालावे लागते. कारण शून्य गुरुत्वाकर्षण अर्थात 'झिरो ग्रॅव्हीटी' असल्यामुळे पाया खाली जमीन नसते.
विद्यार्थ्यांनी अंतराळवीरांना दिले असे वचन
दरम्यान, याच सत्रात एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या नाजूकतेचा, जीवनशैली आणि पाणी पुनर्वापराचा अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. शर्मा हे सन १९८४ मध्ये अंतराळ मोहिमेला गेले होते. त्यावेळी अंतराळातून पृथ्वीवर 'ग्रीनरी' म्हणजे हिरवळ दिसत होती. परंतु, दुसरे अंतराळवीर शुक्ला गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये अंतराळ मोहिमेसाठी गेले होते. त्यावेळी अंतराळातून पृथ्वी करड्या रंगाची दिसत होती. या दोन्ही अनुभवांतून अंतराळवीरांनी पृथ्वीवरील नष्ट होत चालेली वृक्षसंपदा आणि त्यामुळे पृथ्वीला पोहोचणारी हानी याबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच पर्यावरणाबाबत जागृत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरी आम्ही विद्यार्थ्यांनीही ते भविष्यात अधिकाधिक झाडे लावतील असे अभिवचन दोन्ही अंतराळवीरांना दिले.
महापालिका शाळातील मुलाचे कौतुक
या कार्यक्रमादरम्यान महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिंदी सोबतच अस्खलित इंग्रजी भाषेतही मान्यवरांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांचे राकेश शर्मा व सुधांशु शुक्ला यांच्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले. या संवादादरम्यान 'मुंबई क्लायमेट वीक'चे आयोजन करणाऱ्या प्रोजेक्ट मुंबई या संस्थेचे शिशीर जोशी हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. तर सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले







