महाराजांची ४०० वी जयंती जागतिक स्तरावर साजरी होणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवजन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावरून केली. छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता. अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बृहन्मुंबई ...
राज्यकारभारात विविध सुधारणा करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, अशा शब्दात त्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत असल्याचे नमूद करीत फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू - एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराजांनी जलव्यवस्था, अर्थकारण व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पना चारशे वर्षांपूर्वीच राबवल्या. ‘शिवराई’ ही चलन व्यवस्था त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे. जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला परिसराच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवनेरी किल्ला विचार आणि कार्याचे प्रेरणास्थळ - सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून 'किल्ले शिवनेरी विकास आराखडा' साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.