२३ वर्षांच्या यशस्वी बँकिंग प्रवासाला पूर्णविराम; 'मॅनेजमेंट ट्रेनी' ते 'वरिष्ठ उपाध्यक्ष' असा प्रेरणादायी प्रवास
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्सिस बँकेत 'वरिष्ठ उपाध्यक्ष' या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अमृता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या प्रवासाला पूर्णविराम देत असल्याची माहिती दिली.
अमृता फडणवीस यांचा अॅक्सिस बँकेतील प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. २३ वर्षांपूर्वी त्यांनी याच बँकेत 'मॅनेजमेंट ट्रेनी' (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) म्हणून आपल्या करिअरची साधी सुरुवात केली होती. मात्र, आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, सातत्य आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रगतीचा एकेक टप्पा पार केला. शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी आणि ग्राहक संबंध अशा अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या विभागांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले.
राजीनाम्यानंतर दिली भावनिक प्रतिक्रिया
राजीनाम्याची माहिती देताना अमृता फडणवीस यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “अॅक्सिस बँक ही संस्था म्हणजे माझे कुटुंब, गुरु आणि दुसरे घर होते. या प्रदीर्घ प्रवासात साथ देणारे सहकारी, मार्गदर्शन करणारे वरिष्ठ आणि विशेषतः बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे मनापासून आभार”.







