मुंबई : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशकता या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ट संबंध येतो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळे घटक आहेत असे गृहित धरता कामा नये. कार्यालयात एलजीबीटीक्यू आणि संबधित समुदायातील कर्मचारी नियुक्त असतील तर त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. या समुदायाचे मानसिक आरोग्य हे त्यांची स्वतःची वैयक्तिक ओळख, कामाच्या ठिकाणी मिळणारी आपुलकीची वागणूक आणि भीती किंवा दडपणाशिवाय वावरण्याच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असते. संस्थेने कर्मचा-यांच्या सर्वसमावशकतेला प्राधान्य दिल्यास कर्मचा-यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होते. या कर्मचा-यांची कार्यालयीन प्रगती योग्यरितीने विकसित होते. मानसिक आरोग्य सुधारते.
कर्मचा-यांचा मानसिक आरोग्याबाबत सर्वसाधारण चौकटीत अडकणे अयोग्य ठरेल, याची जाणीव अनेक प्रतिथियश संस्थांना झाली आहे. कर्मचा-यांची लिंग ओळख, लैंगिकता, अपंगत्व किंवा न्यूरोडायव्हर्सिटी यांसारख्या वेगवेगळ्या ओळखी त्यांच्या दैनंदिन कामाच्या अनुभवावर कसा परिणाम करतात, याची जाणीव धोरणांमध्ये असणे गरजेचे असल्याचे आता कंपन्यांना उमगले आहे. कार्यालयातील क्विअर समुदायाच्या कर्मचा-यांना मानसिक सुरक्षितता फार गरजेची असते. आपल्या अस्तित्वामुळे भेदभाव, पूर्वग्रह किंवा टीका होणार नाही, याची त्यांना खात्री द्यायला हवी. आपण कार्यालयीन ठिकाणी मूळ अस्तित्वासह स्विकारलो गेलो असल्याची जाणीव त्यांना तणावातून मुक्त करते. कामाच्या ठिकाणी आपला सन्मान केला जात असल्याचे त्यांना जाणवते. हा सकारात्मक स्विकार्ह परिणाम त्यांच्या कामातील एकाग्रता, आत्मविश्वास आणि कामातील सहभागावर वाढवतो.
या समुदायाबद्दलची सर्वसमावेशकता केवळ नावापुरती औपचारिक स्वरुपातील नको. संबंधित समुदाय स्विकारला गेल्याचे दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक उपक्रम, चिन्हे किंवा कधीकाळी मोहीम राबवणे आदी कृती मर्यादित ठरतात. या कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात, धोरणांमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे. यामध्ये कर्मचा-यांच्या जोडीदारांनाही आरोग्यविषयक सुविधा देणे, एलजीबीटीक्यू संबंधित विषयांची समज असलेल्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांची उपल्बधता करुन देणे, लिंग ओळख आणि लिंग अभिव्यक्तीशी संबंधित स्पष्ट व संवेदनशील धोरणे तयार करणे, तसेच मोकळ्या संवादासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरक्षित व विश्वासार्ह यंत्रणाही उभारायला हवी. या उपाययोजना विचारपूर्वक व प्रामाणिकप्रणे राबविल्यास संबंधित संस्था हे कर्मचा-यांच्या कल्याणाला केवळ चेकलिस्टपुरते मर्यादित न ठेवता ख-या अर्थाने सर्वांगीण विकासाला महत्त्व देते, हे दिसून येते.
कोणत्याही संस्थेने कर्मचा-यांवर त्यांची लैंगिक ओळख किंवा लैंगिक आकर्षणाबद्दलची आवड जाहीर करण्यासाठी दबाव आणू नये. अनेक क्विअर कर्मचारी आपली ओळख जाहीर करण्यास मज्जाव करतात. त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान राखला पाहिजे. एखादा कर्मचारी आपल्या ओळखीबाबतीत गोपनीयता राखत असल्यास संबंधित कर्मचा-याच्या निर्णयाचा सन्मान राखला गेला पाहिजे. संबंधितांना सर्व सुख-सोयी तसेच पाठिंबा मिळायला हवा. सर्वसमावेशक धोरणे आणि सुरक्षित वातावरणामुळे काळानुसार कर्मचा-यांमध्ये स्वतःबद्दल मोकळेपणाने व्यक्त होण्याचा आत्मविश्वास बळकावतो. परंतु संबंधितांना आपल्या ओळखीबाबत निर्णय जाहीर करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.
कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना मानसिक सुरक्षितता लाभत असेल तर त्यांची कामाप्रती ओढ आणि कंपनीत टिकण्याची क्षमता वाढते. क्विअर कर्मचा-यांना ही सुरक्षितता मिळाल्यास ते संपूर्ण उर्जेसह सर्जनशील विचारांत, परस्पर सहकार्यात प्रभावीपणे काम करतात. कामातील समस्यांचे वेळेवर निवारण होण्यासाठीही ते मोलाची भूमिका बजावतात. भावनिकदृष्ट्या सुरक्षित कार्यसंस्कृती जपणा-या संस्थांमध्ये वैविध्यपूर्ण टॅलेंट आकर्षित होण्याचे प्रमाणही वाढते. लोकांना आपले विचार मनमोकळपणे मांडायचे स्वातंत्र मिळाल्यास नवनवीन दृष्टीकोन समोर येतात. कामातील संघात ताळमेळ येतो. कामाच्या निकालावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेत प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यावर समाजाची मानसिकता, रुढी आणि स्वीकार यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायातील कर्मचा-यांसाठी आपली ओळख ही कामाच्या ठिकाणी मान्य केली आहे, संबंधित ठिकाणी आपण सुरक्षित आहोत, आपल्याला सन्मानाने वागवले जात आहे, ही भावना त्यांच्या थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करते. एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायाची ही गरज लक्षात घेणा-या संस्था आपल्या कर्मचा-याला व्यक्ती म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बाळगतात. याच संस्था समग्र आणि संवेदनशील व्यवस्थेची उभारणी करण्यास यशस्वी ठरतात. मानसिक आरोग्य या विषयाची सामाजिक बदनामी न करणे, खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन करणे आणि कर्मचा-यांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही संस्थेच्या कार्यउभारणीतील महत्त्वाची पावले ठरतात.
विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकारताना सर्वसमावेशक कार्यालये स्थापन करणे हे कामाच्या संस्कृतीतील दीर्घकालीन धोरण असायला हवे. हे केवळ कागदोपत्री धोरण असणे निरर्थक ठरेल. या प्रक्रियेत संस्थेतील नेतृत्वाची भूमिका फार आवश्यक ठरते. वरिष्ठ कर्मचारी मंडळी बदलांचा स्विकार करत असतील हा सकारात्मक बदल घडून येईल. वरिष्ठांनी सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास हे आपोआप घडून येईल. कार्यालय हे मनमोकळेपणे संवाद साधण्याचे सुरक्षित वातावरण तयार केल्यास संस्थेत विश्वासार्ह आणि भावनिक वातावरण तयार होईल. वरिष्ठांनी ही संवेदनशीलता दाखवल्यास कर्मचा-यांमध्ये सुरक्षित भावना निर्माण होईल. परिणामी संस्थेची प्रगती निश्चित होईल.
सरतेशेवटी, कार्यालयीन ठिकाणी सर्वसमावेशक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ कार्यसंस्कृती निर्माण करणे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी कर्मचा-यांशी संवाद साधणे, त्यांच्या अभिप्रायातून शिकणे आणि काळापरत्वे स्वतःमध्ये बदल घडवन आणणे गरजेचे असते. संस्था सर्वसमावेशकता आणि आरोग्य या दोन्ही घटकांना आपल्या मूळ मूल्यांचा भाग बनवत असल्यास सक्षम कार्यसंस्कृती उदयास येते. ही संस्कृती संपूर्ण टीमला सक्षम बनवते. न्याय्य व समान संधी देणा-या समाजाच्या निर्मितीसाठी हातभार लावते.