Thursday, February 5, 2026

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार

एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

जुन्नर (पुणे): स्वराज्याचे भाग्यविधाते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या विभागाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे भाग्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पुणे- जुन्नर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला मोठी गर्दी झाली होती. जुन्नर ही संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी असलेली, वारकरी संप्रदायाला “राम कृष्ण हरी” हा मंत्र देणारी आणि शिवनेरीसारखी पराक्रमाची भूमी असून ही भूमी मंदिराइतकी पवित्र आहे, असे सांगत त्यांनी येथील लाडक्या बहिणी-भावांना व शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलो असून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. लोकसभा-विधानसभेत कार्यकर्ते मनापासून काम करतात, त्यामुळे अशा कठीण प्रसंगात नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणे हे कर्तव्य आहे. यापूर्वी जुन्नर नगरपालिकेवर भगवा फडकवला व विधानसभेत महायुतीला २३२ जागांचे ऐतिहासिक यश मिळाले त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लिहिण्याचा निर्णय, शेतकरी सन्मान योजना (केंद्राचे ६००० + राज्याचे६०००), पिक विमा व विविध शेतकरी योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा मर्यादा१.५ लाखांवरून ५ लाख, महिलांसाठी आरोग्य योजना व रोजगार उपक्रम असे अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी या योजनांना विरोध केला तरी आम्ही शब्द पाळला असून लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीबाबत समिती गठीत असून योग्य वेळी निर्णय होईल असेही ते म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील बिबट्या दहशतीवर उपाय म्हणून दोन रेस्क्यू सेंटर उभारण्याचा कॅबिनेट निर्णय घेतल्याचे सांगत लोकांचे जीव वाचवणे सरकारचे कर्तव्य असून बिबटमुक्त वातावरण निर्माण करू असे आश्वासन त्यांनी दिले. शिवनेरी पायथ्याशी एमआयडीसी व आयटी पार्क सुरू करणार, भव्य मुख्यद्वार उभारणार, डुंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार व पर्यटनातून रोजगारनिर्मिती करणार तसेच जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. धार्मिक स्थळांचा विकास तसेच बौद्ध लेण्यांचे संवर्धन व गड-किल्ल्यांचे जतन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

मुरबाड-जुन्नर महामार्ग, पुणे-नाशिक रेल्वेला गती, ५६ किमी जुन्नर-तळेगाव रस्ता, चिलेवाडी धरण दुरुस्ती ३१३ कोटी, पूल बांधकाम ३५ कोटी, पारुंडे कुंभमेळा सुविधा २४० कोटी प्रस्ताव, आदिवासी वाड्यांसाठी पाणी योजना, एमआय टँक, बुडीत बंधारे व कालवे, पठारी भागाला पाणीपुरवठा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज अशा विविध विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला.

शेतकरी हा अन्नदाता असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार त्याचा आहे असे त्यांनी नमूद केले. ओतूर व नारायणगाव नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सुरू करू तसेच पर्यटनासाठी नौकानयन परवानगी व स्थानिक युवकांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. शेवटी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व शिवसेना उमेदवारांची नावे जाहीर करून ७ तारखेला धनुष्यबाण बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन करत “धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत” असे सांगितले व पुढील पाच वर्षे सेवा करण्याची हमी दिली.

“जुन्नरचा कायापालट करून शिवभूमीचे ऋण फेडू” असा शब्द देत त्यांनी जय महाराष्ट्रच्या घोषणेत भाषण समाप्त केले.

यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, आमदार शरद सोनावणे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा