Thursday, March 26, 2026

मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ पुसून टाकणार, वॉटर ग्रीड पुन्हा सुरू, कन्नडचा बॅकलॉग भरून काढण्याचा शिंदेंचा निर्धार

मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ पुसून टाकणार, वॉटर ग्रीड पुन्हा सुरू, कन्नडचा बॅकलॉग भरून काढण्याचा शिंदेंचा निर्धार

देवगाव रंगारीतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवण्याचे शिंदेंचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता, मात्र आमच्या सरकारने तो पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील “दुष्काळ” हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  कन्नड तालुक्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेला प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता.

यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश भोरनारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत शिंदे म्हणाले की, राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी या कठीण काळातही निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील सर्व पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला. “ज्या उमेदवारांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या असतात, त्यांचा विजय निश्चित असतो,” असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, आपणही शेतकऱ्याचा मुलगा असून गरिबी, आईची तगमग आणि पत्नीची काटकसर जवळून पाहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेवर विरोध झाला, न्यायालयात आव्हाने दिली गेली, मात्र आज या योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेवर वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा उल्लेख करत, हा खर्च अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिलांनी या रकमेतून लहान व्यवसाय सुरू केले, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घरखर्चाला हातभार लावला असल्याच्या यशकथा त्यांनी उदाहरणांसह मांडल्या.

शिंदे यांनी शिक्षण धोरणाविषयी बोलताना एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेचा उल्लेख केला. त्या घटनेनंतर उच्च शिक्षणासाठी ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “राज्य हे सर्वसामान्यांचे आहे. शिक्षणासाठी कोणालाही आत्महत्या करावी लागू नये, ही आमची भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी पीक विमा योजना, नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या हानीसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले.

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांवर भर देत ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करून दुष्काळ कायमचा संपवण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात ७० ते ८० हजार रुग्णांना सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. “हे पैसे जनतेचे आहेत, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहेत, साठवण्यासाठी नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कन्नड तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, आतापर्यंत कमी निधी मिळाल्याचा बॅकलॉग आता भरून काढला जाईल. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.

महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे सरकारचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत, “जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे,” असे त्यांनी नमूद केले. शिंदे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका करताना म्हटले की, काही लोक फक्त आरोप करतात, घोषणा करतात आणि निवडणुकीपुरते आश्वासन देतात. मात्र आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे. कामातून उत्तर देण्याची आमची परंपरा असून सत्ता येते आणि जाते, पण दिलेला शब्द पाळणारे नेते जनतेच्या मनात कायम राहतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. भाषणाच्या शेवटी येत्या ७ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

“संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. निधी कधीही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी देतो,” असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा