Thursday, March 26, 2026

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही विक्री ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

म्हाडाच्या माहितीनुसार, यामध्ये यापूर्वी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या, मात्र काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे. इच्छुक नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत Book My Home पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरून सदनिका निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदनिका निवड झाल्यानंतर संबंधित विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक असेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होणार आहे.

कोणत्या भागात घरे उपलब्ध

‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या योजनेअंतर्गत कांदिवली (शिंपोली व चारकोप), अँटॉप हिल-वडाळा, पवई, मानखुर्द, मालाड आदी भागांतील एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्राप्त झालेल्या घरे घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी) परिसरात असून अशा एकूण ३६ सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

पात्रतेच्या अटी

अर्जदाराचे वय अर्जाच्या दिवशी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार भारतीय नागरिक असावा. अविवाहित, विवाहित किंवा घटस्फोटित अर्जदारांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षण प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

पेमेंट व सदनिका निश्चिती

अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला उपलब्ध सदनिकांची यादी पाहता येईल. पसंतीची सदनिका निवडल्यावर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सदनिका निश्चितीनंतर १० टक्के रक्कम भरल्यावर तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. उर्वरित रक्कम ९० दिवसांच्या आत भरणे आवश्यक असून, उशीर झाल्यास व्याज आकारले जाणार आहे.

दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन

म्हाडाने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट किंवा दलालाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत संपर्क क्रमांकांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, मुंबईत घर घेण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, मर्यादित सदनिकांमुळे अर्जदारांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे.

Comments
Add Comment