मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली असं विचारून प्रेमाचा कळवळा दाखवणा-या संजय राऊतांचे प्रेम पुतना मावशी सारखे आहे. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना हिणकस वक्तव्ये करत संजय राऊतांनी दिवंगत अजित पवार यांचा अपमान कसा केला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊतांनी दुःखामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी सोडले. या ना त्या प्रकारे सतत नकारात्मक बोलणे, अपप्रचार करणे हेच काम राऊत करत आहेत.राऊतांनी अजितदादांवर वारंवार पातळी सोडून टीका केली होती याचे स्मरणही बन यांनी करून दिले.
अजित दादा यांच्या मृत्यूनंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली जाते आहे, असे म्हणत भाजपावर टीका करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की, राऊतांनी या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. सत्तापदावरच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या पदावरील पुढील नियुक्ती ही क्रमप्राप्त असते. इंदिरा गांधी, जयललिता, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शपथविधी झाला होता याचा दाखला देत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले.
परिस्थितीनुसार कठीण प्रसंगात पक्षाच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष नेता निवड, उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय याबाबत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल. यामध्ये नाहक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन यापुढील निर्णयात शाह यांचा हात असेल असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे अशी प्रखर टीका ही बन यांनी केली.
राऊतांना अजितदादांबद्दल कधीही प्रेम नव्हते, ते सातत्याने अजित पवारांचा द्वेष करायचे. अजितदादांना लोकांचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत होते, याबद्दल सातत्याने उद्धव ठाकरे, उबाठा गट आणि राऊतांनी त्यांचा द्वेष केला, अशी टीका बन यांनी केली. अजितदादांना लोकांनी नेहमीच भरभरून मते देत निवडून दिले होते, संजय राऊत मात्र एकदाही निवडून आले नाहीत, असा टोला बन यांनी लगावला.