४१ अंधांना मिळाली नवी दृष्टी
अलिबाग : मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षाच्या कालावधीत ४१ दृष्टिहिनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.
माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासात काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो आणि हे जग त्यांना पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरिरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या 'कॉनिर्या' या भागाचे रोपण केले जाते.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून ४१ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली, तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.
असे झाले नेत्रदान
१ एप्रिल २१ ते ३१ डिसेंबर २५ या कालावधीत रायगड जिल्ह्यात १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. (२९४ नेत्र बुबुळांचे संकलन) जिल्हा रुग्णालयात ८८ नेत्र बुबुळे संकलन (४४ जणांचे नेत्रदान), शंकर आय बँक १६ नेत्र बुबुळे संकलन (८ नेत्रदान), लक्ष्मी आय बँक १९० नेत्र बुबुळे संकलन (८० जणांचे नेत्रदान), शस्त्रक्रिया ४१, संशोधन ११६, इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ ६.