अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा
नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे केंद्रित असले तरी, या सरकारची ओळख नेहमीच रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म अशी राहिली आहे. देश आता ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर वेगाने पुढे जात असून, संसद सदस्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे सुधारणा अधिक गतीने राबवल्या जात आहेत. सरकारने लास्ट-माईल डिलिव्हरीवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात, हा सरकारचा प्रयत्न आहे. आगामी काळात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून ही सुधारणा प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय तसेच सरकार आणि विरोधकांमधील तीव्र चर्चा पाहायला मिळणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि संसदेत मांडले जाणारे आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून १४० कोटी देशवासीयांचा आत्मविश्वास, परिश्रम आणि आकांक्षा प्रभावीपणे मांडण्यात आल्या. विशेषतः युवकांच्या अपेक्षा आणि भविष्यासंबंधीचा दृष्टिकोन अतिशय अचूक शब्दांत मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी संसद सदस्यांसमोर मांडलेल्या अपेक्षा आणि मार्गदर्शक सूचना सर्व खासदारांनी गांभीर्याने घेतल्या असतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल.
निर्मला सीतारामन
सलग ९व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग ९व्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.
युवक, शेतकरी आणि उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय संधी
२७ देशांसोबत झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, हा करार देशातील युवक, शेतकरी, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राशी संबंधित नागरिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करणार आहे, विशेषतः परदेशात काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी. हा करार आत्मविश्वासी, स्पर्धात्मक आणि उत्पादक भारताच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.