सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी
मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमआयएमचे महत्व वाढणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रमुख समितीवर त्यांचा एक सदस्य असल्यामुळे सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुंबई महापौरपदी महायुतीचा नगरसेवक विराजमान होणार असला तरी, विविध समित्यांमध्ये पदसिद्ध सदस्यांमुळे महायुतीचे जेमतेम बहुमत असले तरी अनेक ठिकाणी महायुती व विरोधकांच्या सदस्यांची संख्या समान आहे. विशेष म्हणजे विरोधकांची संख्या समान होण्यात एमआयएमचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महाविकास आघाडी सोबत एमआयएम राहिल्यास महायुतीला समित्यांमधील सत्ता चालवणे जड जाऊ शकते.
महापालिका सभागृहात महायुतीच्या नगरसेवकांची संख्या ११८ आहे. तर महाविकास आघाडी व एमआयएम यांच्या नगरसेवकांची संख्या १०९ इतकी आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवताना महायुतीला फारसा त्रास होणार नाही. परंतु महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत महायुतीचे १३ तर विरोधकांचे १३ सदस्य राहणार आहेत. त्यामुळे या समितीत बहुमताच्या जोरावर काम करताना अनेक अडचणी येऊ शकतात.
यावेळी एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास महायुतीला फायदा होऊ शकतो तर विरोधकांच्या बाजूने गेल्यास महायुतीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येक मिटींगला आवर्जून उपस्थित रहावे लागणार. अन्यथा स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेले विकास कामांचे प्रस्तावच मंजूर होऊ शकणार नाही. महापालिका सभागृहासह विविध समित्यांमध्ये एमआयएमने तटस्थ भूमिका घ्यावी, यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एमआयएमने अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु एमआयएम ठाकरे बंधूनाही मदत करणार नसल्याचे समजते.