पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. या अपघातात अजित पवारांव्यतिरिक्त त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक या चार जणांचाही मृत्यू झाला. हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
बारामती विमानतळावर विमान उतरविण्यासाठी पुरेशी दृश्यमानता नव्हती. यामुळे वैमानिक धावपट्टीचा अंदाज घेण्यासाठी घिरट्या मारत होता. अखेर धावपट्टीचा अंदाज येताच वैमानिकाने विमान उतरविण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी विमान हवेत हेलकावे खाऊ लागले आणि अचानक एका बाजूस झुकले. धावपट्टीवर जाण्याऐवजी विमान जवळच्या माळरानावर कोसळले. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि इंधन टाकीला आग लागल्यामुळे विमानाचा ढिगारा पेटला. आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करत असलेले मजूर धावत घटनास्थळी आले. कोणीतरी पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे पथक, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. यानंतर आग विझवण्यात आली आणि ढिगाऱ्यातून शोधून माणसांना तातडीने रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळली होती. अपघातात विमानातील सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. यामुळे रुग्णालयात फक्त पुढील वैद्यकीय कारवाईसाठी मृतदेह नेण्याची औपचारिकता सुरू झाली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अहवालानुसार बारामती विमानतळावर कोसळलेले लिअरजेट ४५ विमान नवी दिल्लीस्थित नॉन-शेड्यूल्ड एअरक्राफ्ट ऑपरेटर (एनएसओपी) व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (व्हीएसआर एव्हिएशन) चालवले जात होते.
विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, VT-SSK नोंदणीकृत विमानात पाच जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स आणि तीन प्रवासी होते. लँडिंग दरम्यान ही घटना घडली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी औपचारिक चौकशी सुरू केली आहे.
ऑपरेटरची पार्श्वभूमी
व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड चार्टर जेट, हेलिकॉप्टर, एअर अॅम्ब्युलन्स सेवा आणि विमान भाडेतत्त्वावर चालवते. त्यांच्या ताफ्यात लिअरजेट ४५ विमाने, बीचक्राफ्ट सुपर किंग एअर बी२०० आणि ऑगस्टा हेलिकॉप्टरचा समावेश आहे. कंपनी प्रामुख्याने कॉर्पोरेट आणि व्हीआयपी यांच्यासाठी सेवा पुरवते. या अपघातापूर्वी VT-SSK शी संबंधित कोणत्याही अपघाताची सार्वजनिकरित्या उपलब्ध नोंद नाही. पण विमान वाहतूक सूत्रांनी असे निदर्शनास आणून दिले की २०२३ मध्ये मुंबईत लँडिंग दरम्यान त्याच कंपनीद्वारे चालवले जाणारे आणखी एक लिअरजेट ४५ धावपट्टीवरून घसरले होते, पण त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
आरोप आणि मागण्या
बुधवारी अपघातानंतर, काही सूत्रांनी आरोप केला आहे की व्हीएसआर एव्हिएशनने मागील सुरक्षेच्या चिंता असूनही त्यांचे काम सुरू ठेवले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे आणि दाव्यात किती तथ्य आहे याची तपासणी सुरू असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी दिली आहे.
एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, चौकशी पूर्ण होईपर्यंत ऑपरेटरचा उड्डाण परवाना तात्पुरता निलंबित करण्याची मागणी काही घटकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, असेही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी सांगितले. अपघातग्रस्त विमानाचा फ्लाइट डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, देखभाल नोंदी, हवामान परिस्थिती आणि एटीसी संप्रेषणांचे विश्लेषण केल्यानंतरच ऑपरेटरच्या जबाबदारीबाबत निष्कर्ष काढता येतात; असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी सांगितले.