पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गुरुवारी बारामतीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. ही गंभीर परिस्थिती आणि हवाई सुरक्षेची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाचा ताबा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक मुख्यमंत्री विमानाने किंवा हेलिकॉप्टरने बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षित लँडिंगची जबाबदारी आता पूर्णपणे वायुसेनेकडे असणार आहे.
पुण्यातील लोहेगाव वायुसेना तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण तज्ज्ञांचे एक विशेष पथक तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहे. या पथकाने आपल्यासोबत अत्यावश्यक तांत्रिक उपकरणे आणि संवाद यंत्रणा आणली असून, बारामती विमानतळावर 'इमर्जन्सी एअर ट्रॅफिक कंट्रोल' सेवा सुरू केली आहे. बारामतीमध्ये कायमस्वरूपी रडार किंवा आधुनिक एटीसी नसल्याने, वायुसेनेने आपली फिरती यंत्रणा बसवून विमानांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण स्थापित केले आहे. विमान आणि जमिनीवरील नियंत्रण कक्ष यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विशेष वारंवारतेची उपकरणे कार्यान्वित केली आहेत.
स्थानिक प्रशासनाशी समन्वय
वायुसेनेचे हे पथक स्थानिक प्रशासन आणि नागरी हवाई उड्डाण विभागाच्या समन्वयाने काम करत आहे. बारामती विमानतळाचा परिसर आता एका लष्करी तळाप्रमाणे सुरक्षित करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर वायुसेनेचे बारीक लक्ष आहे.