बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या भीषण दुर्घटनेत दादांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि वैमानिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जनसागर बारामतीकडे झेपावला. शहराकडे येणारे सर्व रस्ते नागरिकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्याची ओढ दिसून येत होती. आज सायंकाळी उशिरा अजित दादांचे पार्थिव रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. यावेळी पवार कुटुंबातील सदस्यांसह राज्यभरातील विविध पक्षांचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी दादांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यदर्शनाचा हा सोहळा अत्यंत हृदयद्रावक होता. दर्शनानंतर पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालय परिसरात नेण्यात आले असून, उद्या सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
पुणे : तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. या निधनावर ...
उपस्थितांचे आभार मानताना जय पवारांना अश्रू अनावर
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. विद्या प्रतिष्ठानमधील अंत्यदर्शन आटोपल्यानंतर दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी दिली. यावेळी जमलेल्या जनसागराशी संवाद साधताना जय पवार यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. जय पवार यावेळी अत्यंत भावूक झाले होते. उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी दादांवर जे अफाट प्रेम केले, ते आज या गर्दीच्या रूपाने मला दिसत आहे. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. दादा आज आपल्यात नसले, तरी ते आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये कायम जिवंत राहतील." "दादांनी आजपर्यंत आपल्या सर्वांसाठी ज्या जिद्दीने लढा दिला, तसाच लढा आपल्याला भविष्यातही द्यायचा आहे," असा निर्धार जय पवार यांनी व्यक्त केला. उद्या सकाळी ११ वाजता अंतिम संस्कारांसाठी पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करताना जय पवारांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावले होते.
"सहकार्य करा, संयम राखा"; पार्थ पवार
दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आली असता, पार्थ पवार यांनी जमलेल्या जनसागराला भावूक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. वाढती गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन पार्थ पवार म्हणाले, "आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. येथून बाहेर पडताना सर्वांनी शिस्त पाळावी. कोणालाही धक्का लागणार नाही, विशेषतः महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या." उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून पुढची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली. पार्थ पवारांनी माहिती दिली की, उद्या सकाळी १० वाजता पुन्हा सर्वजण याच ठिकाणी जमणार आहोत. "आम्ही सर्वजण इथे पुन्हा येणार आहोत, तोपर्यंत सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावे," असे आवाहन त्यांनी केले. शोकाकुल वातावरणातही पार्थ पवारांनी दाखवलेल्या या संयमी नेतृत्वामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
उद्या अंत्यसंस्कार होणार
दरम्यान, आता उद्या सकाळी ११ वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आज बारामतीत अजित पवार यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.