श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली आहेत. नवीन बर्फवृष्टी झाल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मंगळवार २७ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी आणि जाणारी ५० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. "खराब हवामान आणि श्रीनगर विमानतळावर सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे, विमान कंपन्यांनी आजची बहुतेक उड्डाणे रद्द केली आहेत," असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगर विमानतळावर आज चार विमाने येण्याचे नियोजित होते परंतु खराब हवामानामुळे हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ताज्या अपडेट्स आणि पर्यायी व्यवस्थांसाठी प्रवाशांना त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे काश्मीरमध्ये हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. नवयुग बोगदा आणि आसपासच्या परिसरात सुरू असणाऱ्या सततच्या बर्फवृष्टीमुळे मंगळवारी तेथील काही महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त मुघल रोड, एसएसजी रोड आणि सिंथन रोड देखील निसारड्या रस्त्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत जम्मूहून श्रीनगर पर्यंत आणि श्रीनगरवरून जम्मू पर्यंत कोणत्याही वाहनांना प्रवास करण्याची परवानगी नसेल असे वाहतूक अधिकारींनी सांगितले.
सोमवार २६ जानेवारी संध्याकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता श्रीनगर येथील हवामान खात्याने वर्तवली होती. तसेच काही डोंगराळ भागात दरड कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.