नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सोमवारी साजरा होणार असलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन, रविवारी २५ जानेवारी रोजी साजरा होत असलेला राष्ट्रीय मतदान दिन, भारताची आर्थिक प्रगती, देशाचे वाढते सामर्थ्य, प्रतिकूल निसर्गामुळे देशापुढे निर्माण झालेली आव्हानं, भारताची समृद्ध संस्कृती, देशाचे परराष्ट्र संबंध, मलेशियाोबतचे भारताचे मैत्रीचे संबंध, गुजरातमध्ये राबवली जात असलेली सामुदायिक स्वयंपाकघर संकल्पना, वैश्विक कुटुंब आणि त्याच्यापुढील आव्हानं, पश्चिम बंगालची विवेकानंद लोक शिक्षा निकेतन संस्था, देशातली स्वच्छता मोहीम, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, विविध प्रयोग करणारे शेतकरी आदी अनेकविध विषयांचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले ?
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार.
2026 या वर्षातला हा पहिला 'मन की बात' आहे. उद्या 26 जानेवारी रोजी आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. आपलं संविधान याच दिवशी लागू झालं होतं. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांना वंदन करण्याची संधी देतो. आज 25 जानेवारी हा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असतो.
मित्रांनो,
साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती 18 वर्षांची होते आणि मतदार बनते, तेव्हा तो आयुष्यातला एक सामान्य टप्पा समजला जातो. परंतु प्रत्यक्षात हा प्रसंग म्हणजे कोणत्याही भारतीयाच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड असतो. म्हणूनच आपण देशात मतदार होण्याचा आनंद साजरा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तो साजरा करतो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा युवक किंवा युवती पहिल्यांदाच मतदार होते तेव्हा संपूर्ण परिसर, गाव किंवा शहराने एकत्र येऊन त्याचे किंवा तिचे अभिनंदन केलं पाहिजे आणि मिठाई वाटली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढेल. यासोबतच, मतदार असणं किती महत्त्वाचं आहे, ही भावना अधिक दृढ होईल.
मित्रांनो,
जी माणसं आपल्या देशातल्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतात, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भूस्तरावर काम करतात, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो. आज मतदार दिनी मी आपल्या युवा मित्रांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी 18 वर्षं पूर्ण केल्यावर मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करावी. यामुळे संविधानाने प्रत्येक नागरिकाकडून ज्या कर्तव्यभावनेचे पालन करण्याची अपेक्षा ठेवली आहे, ती पूर्ण होईल आणि भारताची लोकशाहीदेखील मजबूत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक कल पाहायला मिळत आहे. लोक 2016 सालच्या आपल्या आठवणींना पुन्हा उजाळा देत आहेत. त्याच भावनेनं आज मीदेखील माझ्या आठवणींपैकी एक तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. दहा वर्षांपूर्वी, जानेवारी 2016 मध्ये आम्ही एका महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही असा विचार केला होता की जरी हा छोटासा असला तरी तो तरुण पिढीसाठी, देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळी काही लोक हे समजूच शकले नव्हते की अखेर हे आहे तरी काय? मित्रांनो, मी ज्या प्रवासाबद्दल बोलत आहे तो आहे स्टार्ट-अप इंडियाचा प्रवास. या अद्भुत प्रवासाचे नायक म्हणजे आपला युवावर्ग. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांनी जो नवोन्मेष दाखवला, त्याची नोंद इतिहासात होत आहे.
मित्रांनो,
आज भारतात जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था तयार झाली आहे. हे स्टार्ट-अप्स अगदी आगळेवेगळे आहेत. आज ते अशा क्षेत्रात काम करत आहेत ज्यांच्याविषयी 10 वर्षांपूर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. एआय, स्पेस, न्यूक्लियर एनर्जी, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, बायोटेक्नॉलॉजी, तुम्ही नाव घ्या आणि कोणता ना कोणता भारतीय स्टार्ट-अप त्या क्षेत्रात काम करताना दिसेल. मी माझ्या सर्व युवा मित्रांना सलाम करतो जे कोणत्या ना कोणत्या स्टार्ट-अपशी जोडले गेले आहेत किंवा स्वतःचा स्टार्ट-अप सुरू करू इच्छितात.
मित्रांनो,
आज 'मन की बात' च्या माध्यमातून मी देशबांधवांना, विशेषतः उद्योग आणि स्टार्ट-अपशी संबंधित तरुणांना, एक आग्रह जरूर करू इच्छितो. भारताची अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत आहे. भारतावर जगाचं लक्ष आहे. अशा वेळी आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारीदेखील आहे. ती जबाबदारी आहे, गुणवत्तेवर भर देण्याची. होता है, चलता है, चल जाएगा, हे युग निघून गेलं आहे.
चला, आपण यावर्षी सर्व ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया. आपला सगळ्यांचा एकच मंत्र असला पाहिजे - गुणवत्ता, गुणवत्ता आणि फक्त गुणवत्ता. कालपेक्षा आज अधिक चांगली गुणवत्ता. आपण जे काही उत्पादन करत असू, त्याची गुणवत्ता अधिक चांगली बनविण्याचा संकल्प करूया. मग ते आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र असो, तंत्रज्ञान असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा अगदी पॅकेजिंग असो, भारतीय उत्पादन याचा अर्थच उच्च दर्जा, असा झाला पाहिजे. चला, उत्कृष्टतेला आपण आपला मानदंड बनवूया. आपण संकल्प करूया की गुणवत्ता जराही कमी होणार नाही, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं, ‘Zero defect – Zero effect’ म्हणजेच 'शून्य दोष - शून्य परिणाम'. असं केल्यानंच आपण विकसित भारताचा प्रवास वेगानं पुढे नेऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या देशातले लोक खूप नाविन्यपूर्ण आहेत. समस्यांवर उपाय शोधणं हे आपल्या देशवासियांच्या स्वभावातच आहे. काही लोक हे काम स्टार्ट-अप्सद्वारे करतात, तर काही लोक समाजाच्या सामूहिक शक्तीद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातल्या आझमगडमधून समोर आला आहे. इथून वाहणाऱ्या तमसा नदीला लोकांनी नवीन जीवन दिलं आहे. तमसा ही केवळ एक नदी नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा जिवंत प्रवाह आहे. अयोध्येतून निघून गंगेत विलीन होणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशातल्या लोकांची जीवनवाहिनी होती, परंतु प्रदूषणामुळे तिच्या अखंड प्रवाहात अडथळे येत होते. गाळ, कचरा आणि घाणीमुळे या नदीचा प्रवाह थांबला होता. त्यानंतर इथल्या लोकांनी तिला नवीन जीवन देण्यासाठी मोहीम सुरू केली.
नदीची सफाई करण्यात आली आणि तिच्या काठावर सावली देणारी, फळे देणारी झाडे लावण्यात आली. स्थानिक लोक कर्तव्यभावनेनं या कामाला भिडले आणि सर्वांच्या प्रयत्नातून नदीचं पुनरुज्जीवन झालं.
मित्रांनो,
लोकसहभागाचा असाच प्रयत्न आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमध्येही बघायला मिळाला आहे. हा असा भाग आहे जो दुष्काळाच्या गंभीर समस्येशी झुंजत आला आहे. इथली माती लाल आणि वाळूयुक्त आहे. त्यामुळे लोकांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत असे. इथे अनेक ठिकाणी बराच काळ पाऊस पडत नाही. कधीकधी तर लोक अनंतपूरची तुलना वाळवंटातल्या दुष्काळी परिस्थितीशीही करतात. मित्रांनो, ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांनी जलाशय साफ करण्याचा संकल्प केला. मग प्रशासनाच्या सहकार्यानं इथे 'अनंत नीरू संरक्षणम प्रकल्प' सुरू करण्यात आला. या प्रयत्नांमुळे 10 हून अधिक जलाशयांना जीवदान मिळालं आहे. या जलाशयांमध्ये आता पाणी जमा होऊ लागलं आहे. यासोबतच 7000 हून जास्त झाडंही लावण्यात आली आहेत. याचाच अर्थ असा की जलसंवर्धनाबरोबर अनंतपूरमध्ये हिरवळही वाढली आहे. मुलं आता इथे पोहण्याचा आनंदही घेऊ शकतात. एकप्रकारे सांगता येईल की इथली संपूर्ण परिसंस्थाच पुन्हा एकदा झळाळून उठली आहे.
मित्रांनो,
आझमगड असो, अनंतपूर असो किंवा देशातलं आणखी कोणतं ठिकाण, लोक एकत्र येऊन कर्तव्यभावनेनं मोठे संकल्प पूर्ण करत आहेत हे पाहून आनंद होतो. लोकसहभाग आणि सामूहिकतेची ही भावना आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या देशात भजन आणि कीर्तन हे शतकानुशतकांपासून आपल्या संस्कृतीचा आत्मा राहिले आहेत. आपण मंदिरांमध्ये भजन ऐकलं आहे, कथा ऐकताना ऐकलं आहे आणि प्रत्येक युगानं आपापल्या काळानुसार भक्तीची आराधना केली आहे. आजची पिढीही काही अद्भुत गोष्टी करत आहे. आजच्या तरुणांनी आपल्या अनुभवांमध्ये आणि जीवनशैलीत भक्तीचा समावेश केला आहे. या विचारसरणीतून एक नवीन सांस्कृतिक कल उदयास आला आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. देशातल्या विविध शहरांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र येत आहे. मंच सजवलेला असतो, रोषणाई केलेली असते, संगीताची साथ असते, पूर्ण थाटमाट असतो आणि वातावरण एखाद्या सांगीतिक कार्यक्रमापेक्षा जराही कमी नसतं. असं वाटतं की एखादा मोठा सांगीतिक कार्यक्रम सुरू आहे, पण तिथे पूर्ण तन्मयतेनं, पूर्ण एकाग्रतेनं, पूर्ण लयद्धतेनं गायली जात असतात ती भजनं! या प्रकाराला आता 'भजन क्लबिंग' असं म्हटलं जात आहे आणि ते विशेषतः जेन झी मध्ये लोकप्रिय होत आहे. हे बघून आनंद होतो की या कार्यक्रमांमध्ये भजनांची प्रतिष्ठा आणि शुद्धता यांची पूर्ण काळजी घेतली जाते. भक्ती हलक्यात घेतली जात नाही. ना शब्दांची मर्यादा ओलांडली जाते, ना भावाची. मंच आधुनिक असू शकतो, संगीत सादरीकरण वेगळं असू शकतं, परंतु मूळ भावना तीच राहते. अध्यात्माचा अखंड प्रवाह तिथे अनुभवता येतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज आपली संस्कृती आणि सण जगभर आपला ठसा उमटवत आहेत. भारतीय सण जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जातात. सर्व प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य कायम राखण्यात आपल्या भारतवंशीय बंधूभगिनींचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते कुठेही असले तरी ते स्वतःच्या संस्कृतीच्या मूलभूत भावनेचं जतन आणि संवर्धन करत आहेत. मलेशियातला आपला भारतीय समुदायदेखील अशाच पद्धतीचं प्रशंसनीय काम करत आहे. तुम्हाला हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मलेशियामध्ये 500 हून अधिक तमिळ शाळा आहेत. यामध्ये तमिळ भाषेच्या अभ्यासासोबतच इतर विषय देखील तमिळमध्ये शिकवले जातात. याशिवाय इथे तेलुगु आणि पंजाबीसह इतर भारतीय भाषांवरदेखील बरंच लक्ष केंद्रित केलं जातं.
मित्रांनो,
भारत आणि मलेशिया दरम्यानचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यात एका सोसायटीनं मोठी भूमिका बजावली आहे. तिचं नाव आहे ‘Malaysia India Heritage Society’
विविध कार्यक्रमांव्यतिरिक्त ही संस्था हेरिटेज वॉक देखील आयोजित करते. यामध्ये दोन्ही देशांना आपसात जोडणाऱ्या सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात मलेशियामध्ये 'लाल पाड साडी' असा आयकॉनिक वॉक आयोजित करण्यात आला होता. या साडीचं आपल्या बंगालच्या संस्कृतीशी एक विशेष नातं आहे. या कार्यक्रमात ही साडी नेसलेल्या लोकांच्या संख्येचा विक्रम निर्माण झाला, जो मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला. या प्रसंगी ओडिसी नृत्य आणि बाउल संगीतानं लोकांची मनं जिंकली. मी म्हणू शकतो –
साया बरबांगा / देंगान डीयास्पोरा इंडिया /
दि मलेशिया //
मेरेका मम्बावा / इंडिया दान मलेशिया /
सेमाकिन रापा //
(मराठी अनुवाद- मला मलेशियातल्या भारतीय समुदायाचा अभिमान आहे, ते भारत आणि मलेशियाला जवळ आणत आहेत.)
मलेशियातल्या आपल्या भारतवंशियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपण भारताच्या कुठल्याही भागात गेलो तरी तिथे आपल्याला काहीतरी असाधारण आणि अभूतपूर्व घडताना नक्कीच दिसतं. अनेकदा माध्यमांच्या झगमगाटात या गोष्टींना स्थान मिळत नाही. मात्र त्यातून समजतं की आपल्या समाजाची खरी ताकद काय आहे ? त्यातून आपल्या मूल्य व्यवस्थेची देखील झलक पहायला मिळते ज्यात एकतेची भावना सर्वोपरि आहे. गुजरातमधील बेचराजी येथील चंदनकी गाँव ची एक अनोखी परंपरा आहे. जर मी तुम्हाला सांगितले की इथले लोक, विशेषतः ज्येष्ठ मंडळी, आपल्या घरी स्वयंपाक बनवत नाहीत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचे कारण आहे गावातील शानदार कम्युनिटी किचन अर्थात सामुदायिक स्वयंपाकघर. या कम्युनिटी किचनमध्ये एका वेळी संपूर्ण गावाचे जेवण बनवलं जातं आणि लोक एकत्र बसून जेवतात. गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा नित्यनियमाने सुरु आहे. एवढंच नाही, जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठी टिफिन सेवा देखील उपलब्ध आहे, म्हणजेच घरपोच सेवेची देखील संपूर्ण व्यवस्था आहे. गावातील हे सामुदायिक भोजन लोकांना भरपूर आनंद देतं . हा उपक्रम केवळ लोकांना परस्परांशी जोडत नाही तर त्यातून कौटुंबिक भावना देखील वाढीस लागते.
मित्रांनो,
भारतातील कुटुंब व्यवस्था ही आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये अशा कुटुंब व्यवस्थेप्रती अतिशय आदराची भावना आहे. काही दिवसांपूर्वीच, माझे मित्र , युएईचे अध्यक्ष, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान भारतात आले होते. त्यांनी मला सांगितले की युएई 2026 हे वर्ष कुटुंब वर्ष म्हणून साजरे करत आहे. इथल्या लोकांमध्ये सौहार्द आणि सामुदायिक भावना अधिक मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे; खरोखरच हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे.
मित्रांनो,
जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते , तेव्हा आपण मोठ्यातल्या मोठ्या आव्हानांवरही मात करू शकतो. मला अनंतनागमधील शेखगुंड गावाबद्दल माहिती मिळाली आहे. इथे अंमली पदार्थ, तंबाखू, सिगारेट आणि दारूशी संबंधित आव्हाने खूप वाढली होती. हे सर्व पाहून इथले मीर जाफरजी इतके अस्वस्थ झाले की त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र केले. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की इथल्या स्थानिक दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं बंद केलं. या प्रयत्नांमुळे अंमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता देखील वाढली.
मित्रांनो,
आपल्या देशात अशा अनेक संस्था आहेत, ज्या वर्षानुवर्षे निःस्वार्थ भावनेनं समाजसेवा करत आहेत. अशीच एक संस्था पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूर इथं आहे. तिचे नाव आहे 'विवेकानंद लोक शिक्षा निकेतन’. ही संस्था गेल्या चार दशकांपासून मुलांची आणि वृद्धांची देखभाल करत आहे. गुरुकुल पद्धतीतील शिक्षण आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच, ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक उदात्त कार्यांमध्ये सहभागी आहे. देशवासियांमध्ये निःस्वार्थ सेवेची ही भावना अधिकाधिक दृढ होत राहो अशी माझी इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपण "मन की बात" मध्ये नेहमीच स्वच्छतेबाबत बोलत आलो आहोत. आपले युवक आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेबद्दल खूप जागरूक आहेत हे पाहून मला अभिमान वाटतो. अरुणाचल प्रदेशातल्या अशाच एका अनोख्या प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश ही ती भूमी आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्याची किरणे पोहोचतात. इथे लोक "जय हिंद" म्हणत एकमेकांना अभिवादन करतात. इथे इटानगरमध्ये, जिथे अधिक लक्ष देण्याची गरज होती त्या ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी तरुणांचा गट एकत्र आला . या तरुणांनी निरनिराळ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई हे आपले ध्येय ठेवले. त्यानंतर, इटानगर, नाहरलागुन, दोईमुख, सेप्पा, पालिन आणि पासीघाट इथे देखील ही मोहीम राबवण्यात आली. या तरुणांनी आतापर्यन्त 11 लाख किलोहून अधिक कचरा साफ केला आहे. कल्पना करा मित्रांनो, तरुणांनी मिळून 11 लाख किलो कचरा हटवला आहे .
मित्रांनो,
आणखी एक उदाहरण आसाममधले आहे. आसाममधल्या नागावमध्ये तिथल्या जुन्या गल्ल्यांशी लोक भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. इथे काही लोकांनी एकत्रितपणे आपल्या गल्ल्या स्वच्छ करण्याचा संकल्प केला. हळूहळू, आणखी लोक त्यांच्याबरोबर जोडले गेले. अशाप्रकारे, एक अशी टीम तयार झाली, ज्यांनी गल्ल्यांमधून मोठ्या प्रमाणात कचरा काढून टाकला. मित्रांनो, असाच एक प्रयत्न बेंगळुरूमध्येही सुरू आहे. बेंगळुरूमध्ये सोफ्याचा कचरा ही एक मोठी समस्या बनून समोर आली आहे, त्यासाठी काही व्यावसायिक एकत्र येऊन त्यांच्या पद्धतीने ही समस्या सोडवत आहेत.
मित्रांनो,
आज अनेक शहरांमध्ये अशा टीम आहेत ज्या कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करण्याचे काम करत आहेत. चेन्नईत अशाच एका टीमने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. अशी उदाहरणांमधून समजतं की स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक प्रयत्न किती महत्वाचा आहे. स्वच्छतेसाठी आपण वैयक्तिकरित्या किंवा संघ म्हणून आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत, तेव्हाच आपली शहरे अधिक चांगली बनतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
जेव्हा पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलले जातं , तेव्हा नेहमी आपल्या मनात मोठ्या योजना, मोठे अभियान आणि मोठ- मोठ्या संघटनांचा विचार येतो. परंतु, अनेकदा बदलाची सुरुवात अतिशय साधारण पद्धतीने होते. एका व्यक्तीमुळे , एका परिसरातून , एक पाऊल उचलल्यामुळे आणि सातत्याने केलेल्या छोट्या -छोट्या प्रयत्नांमुळेही मोठे बदल घडू शकतात. पश्चिम बंगालमधील कूचबिहार इथं राहणारे बेनॉय दास जी यांचे प्रयत्न हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, त्यांनी एकट्याने आपला जिल्हा हरित बनवण्यासाठी काम केले आहे. बेनॉय दास यांनी हजारो झाडे लावली आहेत. अनेकद रोपे खरेदी करण्यापासून ते ती लावणे आणि त्यांची काळजी घेणे या सर्व खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली आहे. आवश्यकता भासली तिथं त्यांनी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि महानगरपालिकांच्या मदतीनं काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या कडेला हिरवळ आणखी वाढली आहे.
मित्रांनो,
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जगदीश प्रसाद अहिरवार जी , त्यांचा प्रयत्न देखील खूप कौतुकास्पद आहे. ते जंगलात बीटगार्ड म्हणून काम करतात. एकदा गस्त घालत असताना, त्यांच्या लक्षात आलं की जंगलात असलेल्या अनेक औषधी वनस्पतींबद्दलची माहिती कुठेही व्यवस्थितपणे नोंदवलेली नाही. जगदीश जींना हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचे होते, म्हणून त्यांनी औषधी वनस्पती ओळखण्यास आणि त्यांची नोंद करण्यास सुरुवात केली. त्यांनी सव्वाशेहून अधिक औषधी वनस्पतींची ओळख पटवली. त्यांनी प्रत्येक वनस्पतीबद्दल माहिती गोळा केली, ज्यामध्ये त्याचे छायाचित्र, नाव, उपयोग आणि मिळण्याचे ठिकाण यांचा समावेश होता. त्यांनी जमवलेली माहिती वन विभागाने संकलित केली आणि ती पुस्तक रुपात प्रकाशित देखील केली. या पुस्तकात दिलेली माहिती आता संशोधक, विद्यार्थी आणि वन अधिकाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे.
मित्रांनो,
पर्यावरण रक्षणाची हीच भावना आज मोठ्या प्रमाणातही दिसून येत आहे. याच विचाराने , देशभरात "एक पेड़ माँ के नाम" अभियान राबवलं जात आहे.या अभियानामुळे आज कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत देशात 200 कोटींहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. यावरून असे दिसून येते की लोक आता पर्यावरण संरक्षणाबद्दल अधिक जागरूक आहेत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान देऊ इच्छित आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
मला तुम्हा सर्वांचे आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे -ते म्हणजे भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न. मला हे पाहून आनंद झाला की श्री अन्न प्रति देशातल्या लोकांचे प्रेम निरंतर वाढत आहे . खरं तर 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून आम्ही घोषित केले होतं. मात्र आज तीन वर्षांनंतर देखील देशात आणि जगात याबद्दल जो उत्साह आणि वचनबद्धता आहे ती खूप उत्साहवर्धक आहे.
मित्रांनो,
तामिळनाडूच्या कल्ल-कुरिची जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा एक गट प्रेरणास्रोत बनला आहे. इथल्या पेरियापलयम मिलेट एफपीसी शी जवळपास 800 महिला शेतकरी जोडल्या गेल्या आहेत. भरडधान्याची वाढती लोकप्रियता पाहून, या महिलांनी भरडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन केली. आता, त्या भरडधान्यापासून बनवलेली उत्पादनं थेट बाजारात पुरवत आहेत.
मित्रांनो,
राजस्थानच्या रामसर येथील शेतकरी देखील श्रीअन्न बाबत नवनवीन संशोधन करत आहेत. येथील रामसर ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीशी 900 हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. हे शेतकरी प्रामुख्याने बाजरीची लागवड करतात. इथे बाजरीवर प्रक्रिया करून खाण्यास तयार लाडू बनवले जातात. त्यांना बाजारात मोठी मागणी आहे. एवढंच नाही मित्रांनो , मला हे ऐकून आनंद झाला की आजकाल अनेक मंदिरे अशी आहेत, जी आपल्या प्रसादात केवळ भरडधान्याचा वापर करतात. त्या मंदिराच्या सर्व व्यवस्थापकांचे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भरडधान्य श्रीअन्न यामुळे अन्नदात्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच , लोकांच्या आरोग्यात सुधारणेची हमी बनत आहे. भरडधान्य अतिशय पौष्टिक असते आणि ते एक सुपरफूड मानले जाते. आपल्या देशात हिवाळा हा ऋतू आहारासाठी अतिशय उत्तम मानला जातो. म्हणूनच , या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात श्रीअन्नाचा समावेश अवश्य करायला हवा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
"मन की बात" मध्ये पुन्हा एकदा आपल्याला विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आपल्या देशाची उल्लेखनीय कामगिरी जाणून घेण्याची आणि ती साजरी करण्याची संधी देतो. फेब्रुवारीमध्ये अशीच आणखी एक संधी येत आहे. पुढल्या महिन्यात इंडिया एआय इम्पॅक्ट समिट होणार आहे. या शिखर परिषदेसाठी जगभरातील, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ भारतात येतील. या परिषदेच्या निमित्ताने एआय जगतातील भारताची प्रगती आणि कामगिरी देखील सर्वांसमोर येईल.
यात सहभागी होणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पुढल्या महिन्यात मन की बातमध्ये आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिट बद्दल नक्कीच बोलू. आपल्या देशवासीयांच्या इतर उल्लेखनीय कामगिरींबद्दल देखील आपण चर्चा करू. तोपर्यंत, "मन की बात" मधून मी निरोप घेतो. उद्याच्या प्रजासत्ताक दिनासाठी पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद.