महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री'


तारपा सम्राट' भिकल्या धिंडा, रघुवीर खेडकर, डॉ.अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड यांच्यासह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री


महाराष्ट्राच्या खात्यात १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री


नवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ या वर्षासाठी १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील एकूण १५ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह १३ व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मा,अभिनेता आर. माधवन, पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह ११३ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत. त्यापैकी सहा परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील आहेत. सोळा व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.



Padma Awards 2026_India by prahaarseo



महाराष्ट्रातील एकूण १५ जणांना पद्म पुरस्कार


महाराष्ट्रातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, तर अलका याज्ञिक, दिवंगत पीयूष पांडे(मरणोत्तर), उदय कोटक यांना पद्मभूषण तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर माधवन, लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर, डॉ.अर्मिडा फर्नांडिस, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांच्यासह ११ जणांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली.


महाराष्ट्रातील पद्म विजेते


पद्मविभूषण

धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) (कला)

पद्मभूषण


अलका याज्ञिक (कला)


पीयूष पांडे (मरणोत्तर) (कला)


उदय कोटक (उद्योग)


पद्मश्री


अर्मिडा फर्नांडिस (मेडिसिन)


अशोक खाडे (उद्योग)


भिकल्या लाडक्या धिंडा (कला)


जनार्धन बापुराव बोठे (सामाजिक कार्य)


जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी)


माधवन रंगनाथन (कला)


रघुवीर खेडकर (कला)


रोहित शर्मा (क्रीडा)


सतीश शाह(मरणोत्तर) (कला)


सत्यनारायण नवल (उद्योग)


श्रीरंग लाड (कृषी)


पालघरचे 'तारपा सम्राट' भिकल्या लाडक्या धिंडा


आदिवासी वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या 'तारपा' वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या वाळवंडे गावच्या या ९० वर्षीय कलाकाराने गेल्या १५० वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा जिवंत ठेवली आहे.


लोककलेचा सन्मान: रघुवीर खेडकर


नगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 'रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर' या तमाशा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककलेची सेवा केली. तमाशासारख्या ग्रामीण कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे.


वैद्यकीय क्षेत्रात क्रांती: डॉ. अर्मिडा फर्नांडिस


मुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि 'स्नेहा' संस्थेच्या संस्थापिका डॉ.अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली 'ह्युमन मिल्क बँक' (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे.


कृषी ऋषी: श्रीरंग लाड


परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणत्याही मोठ्या पदव्या नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कापसाच्या अशा वाणांचा शोध लावला, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उभारी मिळाली असून, एका सामान्य शेतकऱ्याचा हा गौरव कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.


महाराष्ट्रातील ८९अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर


भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे 'राष्ट्रपती पदक' पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०,अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.
Comments
Add Comment

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

पद्म पुरस्कारांची घोषणा, केरळच्या तिघांना पद्मविभूषण तर कोश्यारी आणि शिबू सोरेनना पद्मभूषण पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची

पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमातून साधला देशवासियांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार २५ जानेवारी २०२६