मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुंबई पुणे दृतगती महामार्गासह, मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेण खोपोली आणि वडखळ अलिबाग मार्गावरील वाहतुकही द्रुतगतीने सुरू होती. तसेच,लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लोणावळा, माथेरान आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या गाडयांना या कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.
मुंबईकर मौजमजा करण्यास बाहेर पडले त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे दुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. घाट परिसरात पुणे मार्गिकेवर वाहतुक अतिशय धिम्या गतीने सुरू होती. घाट परिसरात वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, घाटात वाहने बंद पडण्याच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली होती. वाहतुक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतुक नियमन करणे अवघड झाले होते. मुंबई मार्गावर छोटे ब्लॉक घेऊन पुणे मार्गावरील वाहतूक मंबई मार्गावर वळवून पुढे पाठवली जात होती.
मुंबई गोवा महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा…
मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. महामार्गावर इंदापूर माणगाव येथे प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. वाहन चालका लेनची शिस्त पाळत नसल्याने, वाहतुक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. या परिसरात वाहनांच्या आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतुक नियमन करतांना पोलीसांना कसरत करावी लागत होती. अलिबाग वडखळ महामार्गावरही सकाळपासून वाहनांची संख्या वाढली होती. वडखळ ते पोयनाड, पेझारी ते तिनवीरा आणि वाडगाव ते अलिबाग दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अर्धा तासात जे अंतर पार करणे अपेक्षित होते दीड तास ते पावणे दोन तास लागत होते.मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाहतुक कोंडी होती. बोरघाट पोलीस आणि महामार्ग पोलीस यांना वाहतूक नियमनासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. दुपारनंतर वाहनांची संख्या कमी होईन परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा पोलीसांना होती. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत वाहतूक कोडी कायम होती.