मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी, २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर एकाचवेळी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अभियांत्रिकी, तांत्रिक सुधारणा आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल सेवांमध्ये बदल, विलंब आणि काही सेवा रद्द होण्याचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत अप आणि डाऊन दिशेने मेगाब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या अनेक जलद लोकल माटुंगा स्थानकापासून धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. परिणामी, या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील आणि प्रवासाचा वेळ वाढेल. ठाण्याहून येणाऱ्या काही अप जलद लोकल मुलुंड स्थानकापासून धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, माटुंगा स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. मध्य रेल्वेवरील बहुतांश लोकल सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/बांद्रा दरम्यान डाउन दिशेने दुपारी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत ब्लॉक असेल. तर चुनाभट्टी/बांद्रा ते सीएसएमटी दरम्यान अप दिशेने सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत सेवा विस्कळीत राहणार आहेत.
ट्रान्स-हार्बर मार्गावरही अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच गोरेगाव आणि बांद्राकडे जाणाऱ्या काही सेवा या कालावधीत पूर्णतः रद्द राहतील. याशिवाय पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या तसेच गोरेगाव आणि बांद्राहून येणाऱ्या अप दिशेतील अनेक लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ गृहीत धरण्याचे आवाहन केले आहे.