आ. निरंजन डावखरे आग्रही; शिवसेनेत तणाव
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप महायुतीने निवडणूक लढवली असली तरी आता सत्तेतील महत्त्वाच्या पदावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढताना आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच भाजपने थेट ठाणे महापौरपदावर दावा केला असून, भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे.
यंदा ठाणे महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील ९ जागांपैकी ७ जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे, तर २ जागा भाजपकडे आहेत. शिवसेनेकडून महापौरपदासाठी नावे पुढे येत असतानाच भाजपने अडीच वर्षे महापौरपद देण्याची मागणी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आ. निरंजन डावखरे यांनी आम्ही महायुतीत आहोत, मात्र शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजपलाही संधी मिळावी, अशी भूमिका मांडली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला ७५ जागा मिळाल्या असून, भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, युतीत जागावाटपात भाजपने दोन पावले मागे टाकली असल्याचा दावा करत, आता सत्तेतील महत्त्वाचे पद भाजपकडे यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापौरपद भाजपला मिळाले नाही, तर वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.जर भाजपच्या वाट्याला महापौरपद आले, तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे दोन नगरसेवक चर्चेत आहेत.
प्रभाग क्रमांक १५ (अ) मधून विजयी झालेले सुरेश कांबळे आणि प्रभाग क्रमांक २२ (अ) महिला मधून निवडून आलेल्या उषा वाघ यांची नावे भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.
महापौरपदाच्या या दाव्यामुळे ठाण्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.