वाडा : वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या श्रीदत्त इंटरप्रायझेस या टायर रिसायकलिंग कंपनीत बुधवारी रात्री उशिरा रिअॅक्टरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात चार कामगार गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे तालुक्यातील बेकायदेशीर आणि धोकादायक कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदत्त इंटरप्रायझेसमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑईल आणि तारा काढण्याचे काम केले जाते. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास काम सुरू असताना अचानक रिअॅक्टरचा स्फोट झाला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. रात्रीची वेळ असल्याने कामगारांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. वाडा तालुक्यात सुमारे ७७ हून अधिक कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांना प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याने प्रशासनाने 'बंद'च्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र, तरीही अनेक कंपन्यांचे मालक रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने उत्पादन सुरू ठेवतात. गेल्याच महिन्यात लखमापूर येथील टायर कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच उसरमध्ये पुन्हा भीषण अपघात झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.