वसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून डासांच्या प्रादुर्भावात प्रचंड वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागोजागी पसरलेली अस्वच्छता, उघडी गटारे आणि पालिकेच्या धूर फवारणीचा अभाव यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचे सावट निर्माण झाले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा उपनगरांतील सखल भागात साचलेले पाणी आणि उघड्या नाल्यांमधील कचरा डासांच्या उत्पत्तीचे मुख्य केंद्र बनले आहेत. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या पानवेली न काढल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, दिवसाढवळ्याही डास चावत असल्याने नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून घरात राहावे लागत आहे. "डासांच्या भीतीने बाहेरून येणारी मोकळी हवा घेणेही कठीण झाले आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. संध्याकाळ होताच डासांचा हल्ला वाढल्याने घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास प्रतिबंधक उदबत्त्या आणि कॉइल्सचा वापर करूनही डास कमी होत नसल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दुसरीकडे, महापालिकेकडून नियमित औषध फवारणी आणि धूर फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे.