नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता सिग्नल तोडणं किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणं चांगलंच महागात पडणार आहे. जर एका वर्षात तुम्ही पाचवेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. ही ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटर व्हेइकल सुधारणा नियमात करण्यात आल्याचे वृत्त आहे. १जानेवारीपासून लागू झालेले हे नियम भारतीय रस्त्यांवर शिस्त आणण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल मानले जात आहे. सरकारचा स्पष्ट संदेश असा आहे की, नियम मोडल्याबद्दल दंड भरून वाहनचालक आता सुटू शकत नाहीत; त्याऐवजी, त्यांनी त्यांचा परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. नवीन मोटर वाहन नियमांनुसार, आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना ही शक्ती दिली आहे की, ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसेन्सवर निलंबनाची कारवाई सुरु करु शकतील. खरंतर असं करण्यापूर्वी परवाना धारकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. अधिसूचनेमध्ये सांगितले आहे की, उल्लंघनाची गणना एक वर्षाच्या कालावधीच्या आत केली जाईल. चांगली बातमी अशी आहे की मागील वर्षातील उल्लंघने पुढील वर्षाच्या गणनेत जोडली जाणार नाहीत, म्हणजेच, उल्लंघनाची नोंद दरवर्षी आपोआप शून्य मानली जाईल. नव्या तरतुदीनुसार पाच वाहतुकीसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये हेलमेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल मोडणे या सारख्या तुलनेनं कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला.