दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलासाठी प्रस्तावित एकूण ३१ खांबांपैकी ३० खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. एकूण ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. खांबांमधील प्रत्येक प्रसारणखंड , उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग तसेच अनुषंगिक संरचनात्मक व स्थापत्य कामे निश्चित वेळापत्रकानुसार सुरू आहेत. तथापि, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्‍ध करावी. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.


गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्‍या कामाची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी प्रत्‍यक्ष पाहणी केली. या पाहणी दौ-यास कार्यकारी अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते.


गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्‍या या प्रकल्पामुळे पूर्व - पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. इंधन वापरात बचत होण्यासह मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होणार आहे.


दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. त्यामध्ये गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. दिंडोशी न्‍यायालयापासून पुलास सुरूवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३० खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी १७ स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १३ स्पॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे. एकूण ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे.


खांबांवर तुळई स्‍थापित करणे, डेक स्‍लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी कालावधी निश्चित करण्‍यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्‍ध करून देण्‍याबाबत संबंधितांना निर्देश देण्‍यात आले आहेत. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)

डांबराच्या भट्टीकडे पालिकेचे दुर्लक्ष

विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील म्हाडा वसाहत एकतानगर, सुंदर नगर,

दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार

४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट मुंबई : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात समाजोपयोगी उपक्रम

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता, मराठी भाषा

Mega Block Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; येत्या रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी, २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वे, हार्बर