मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर टांगती तलवार असलेल्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आधी एसीबी आणि आता ईडी, अशा दोन्ही यंत्रणांकडून भुजबळ आता पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले आहेत.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल ८५० कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात केवळ राजकीय चर्चाच झाली नाही, तर भुजबळांना दोन वर्षे तुरुंगातही राहावे लागले होते. त्यांच्यासह एकूण १४ जणांची नावे या कथित घोटाळ्यात गुंतलेली होती. मात्र, प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर आता त्यांच्यावरील सर्व आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे.
काही काळापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्याअभावी भुजबळांना दोषमुक्त केले होते. मुख्य गुन्हाच सिद्ध न झाल्याने ईडीनेही आता त्यांच्या निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर केला आहे. या क्लिनचीटमुळे भुजबळ आता कायदेशीर कचाट्यातून पूर्णपणे बाहेर आले आहेत. छगन भुजबळ आणि इतर सह-आरोपींनी निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ईडीचा खटला रद्दबातल ठरवत भुजबळांना दोषमुक्त केले.