वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेकरिता रवाना झाले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच त्यांच्या विशेष विमानाला तांत्रिक कारणांमुळे प्रवास अर्धवट सोडावा लागला. विमानाने नियोजित मार्ग बदलत तातडीने अमेरिकेत परत येत सुरक्षित लँडिंग केले.
व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून विमानात तांत्रिक अडचण आढळल्यामुळे प्रवास पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विमानाचे मेरीलँडमधील जॉइंट बेस येथे इमर्जन्सी लँडिंग कऱण्यात आली.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व दिले जात आहे. अमेरिकेचे इराणसोबत तसेच ग्रीनलँडशी संबंधित मुद्द्यांवर मतभेद वाढलेले असताना ट्रम्प यांचा दावोस दौरा अचानक थांबल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
अधिकृत पातळीवर मात्र या घटनेचा आंतरराष्ट्रीय तणावाशी कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ट्रम्प पुढील काही तासांत पर्यायी विमानाने दावोसकडे रवाना होणार की दौरा रद्द होणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे अमेरिकेतील तसेच जागतिक राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.