डॅरिल मिशेलने इतिहास रचत आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवली आहे. सध्या त्याची रेटिंग 845 इतकी असून तो मोठ्या फरकाने अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मागील आठवड्यात मिशेल दुसऱ्या क्रमांकावर होता आणि केवळ एका रेटिंग पॉइंटने कोहलीच्या मागे होता. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वनडेत शतकी खेळी केली होती, तरीही त्याला अव्वल स्थान कायम ठेवता आले नाही. सध्या कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याची रेटिंग 795 इतकी आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी दिसणार असल्याने पुन्हा नंबर-वन स्थान मिळवणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मालाही या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तो आता चौथ्या स्थानावर घसरला असून त्याची रेटिंग 757 आहे. संपूर्ण भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत रोहितच्या बॅटमधून एकही अर्धशतक न निघाल्याने त्याला याचा फटका बसला. तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान असून त्याची रेटिंग 764 आहे. आयसीसी क्रमवारीतील या बदलांनी वनडे क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेली चुरस अधोरेखित केली आहे.