मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. या तांत्रिक मंजुरीमुळे दहिसर ते काशिगाव हा मार्ग आता अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, फेब्रुवारी महिन्यात हा सुखद प्रवास सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मेट्रो-९ मार्गिकेवर मेट्रो धावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवणे ही मोठी उपलब्धी आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरील ट्रॅक, सिग्नलिंग, वीज पुरवठा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची सखोल तपासणी पूर्ण केली आहे. या परीक्षणात मेट्रो यशस्वी ठरल्याने आता या मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त शोधण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रो-९ (दहिसर-काशिगाव) आणि मेट्रो २-बी (मंडाळे ते डी.एन. नगर) चा पहिला टप्पा एकाच वेळी किंवा काही दिवसांच्या अंतराने सुरू करण्याचे नियोजन आहे. दोन्ही मार्गिकांच्या कामाचा वेग पाहता, फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांना दुहेरी मेट्रो भेट मिळण्याची शक्यता आहे.
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड गाठला आहे. रायगड जिल्ह्यातील 'पेण ग्रोथ ...
वाहतूक कोंडी आणि वेळेची बचत
दहिसर ते मीरा-भाईंदर या दरम्यान सध्या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) गर्दीमुळे प्रवाशांचा तासनतास वेळ वाया जातो. मेट्रो-९ सुरू झाल्यामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. दहिसर आणि काशिगाव ही दोन महत्त्वाची उपनगरे मेट्रोने जोडली गेल्याने रेल्वे आणि रस्त्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात या मार्गिकेचे उद्घाटन सोहळा पार पडू शकतो. काही किरकोळ सुशोभीकरणाची कामे वगळता सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता फक्त प्रत्यक्षात प्रवाशांना मेट्रोमध्ये बसण्याची उत्सुकता लागली आहे.
४.४ किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारीत धावणार
दहिसर ते मीरा भाईंदर (मेट्रो-९) या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या ४.४ किलोमीटर अंतरावर मेट्रो धावण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला असून, एमएमआरडीएने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मेट्रो-९ ही मार्गिका एकूण १३.६ किलोमीटर लांबीची असून त्यावर एकूण १० स्थानके असणार आहेत. सध्या यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे दहिसर आणि भाईंदर दरम्यानचा प्रवासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत तासनतास अडकणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेट्रो संजीवनी ठरणार आहे. एमएमआरडीएचे सुरुवातीचे नियोजन ही मेट्रो जानेवारी २०२६ च्या अखेरीस सुरू करण्याचे होते. मात्र, सोमवारी मिळालेल्या सीएमआरएस (CMRS) प्रमाणपत्रामुळे आता सर्व कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. आता केवळ उद्घाटनाचा मुहूर्त मिळणे बाकी असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना ही मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीए केवळ मेट्रो-९ च नव्हे, तर मंडाळे ते डी.एन. नगर (मेट्रो २-बी) या मार्गिकेचा पहिला टप्पा देखील याच मुहूर्तावर सुरू करण्याच्या तयारीत आहे.
प्रमाणपत्र मिळूनही 'मेट्रो २-बी' स्थानकावरच रखडली! आता तरी लोकार्पण होणार का?
आश्चर्याची बाब म्हणजे, या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर या पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळून आता तब्बल तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या मार्गावर मेट्रो धावू शकलेली नाही. मेट्रो २-बी मार्गिका तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज असूनही केवळ उद्घाटनाच्या अधिकृत सोहळ्यासाठी ती थांबवण्यात आली आहे. मेट्रो २-बी ही मार्गिका पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मंडाळे ते चेंबूर हा टप्पा सुरू झाल्यास मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी परिसरातील प्रवाशांना शिवाजी नगर किंवा चेंबूर गाठणे अत्यंत सोपे होणार आहे. बस आणि रिक्षेच्या रांगेतून प्रवाशांची सुटका होईल, मात्र उद्घाटनाचा पेच सुटल्याशिवाय हे शक्य नाही. मेट्रो २-बी आणि नुकत्याच सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेल्या मेट्रो-९ (दहिसर-काशिगाव) या दोन्ही मार्गांचे उद्घाटन एकत्रितपणे करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जाऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात दोन्ही मेट्रो मार्गिका एकाच वेळी सुरू करून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होण्याची शक्यता आहे.