नेमकी पार्श्वभूमी: शेख करीम हे शहरात बटाटा विक्रीचा व्यवसाय करत होते. व्यवसायाची चक्रे फिरवण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज त्यांच्या जीवावर उठेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सावकारांनी कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. १९ जानेवारी रोजी, जेव्हा शहरात आठवडी बाजार भरला होता, तेव्हा एका महिला सावकाराने भरबाजारात करीम यांना अडवून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सर्वांसमोर झालेला हा अपमान करीम यांच्या जिव्हारी लागला. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन कुटुंबासमोरही त्यांना मानसिक त्रास दिला होता.
हृदयद्रावक शेवटचा व्हिडिओ: मंगळवारी सकाळी, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी करीम यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक भावूक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला. "माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण विक्या आणि मुक्या मला खूप त्रास देत आहेत. या जाचाला आता मी कंटाळलो आहे," असे म्हणत त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. सात जणांवर गुन्हा दाखल: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि व्हिडिओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अन्नू आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत यांचा समावेश आहे.