गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम
मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारी 'शटल क्वीन' सायना नेहवाल हिने अखेर व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सतावणाऱ्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे सायनाने हा भावनिक निर्णय घेतला असून, भारतीय बॅडमिंटनमधील एका देदीप्यमान युगाचा अंत झाला आहे.
तसेच कोणत्याही सोशल मीडिया पोस्टऐवजी एका विशेष मुलाखतीत सायनाने आपल्या निवृत्तीचा खुलासा केला. तिने सांगितले की, "माझ्या गुडघ्यातील 'कार्टिलेज' पूर्णपणे खराब झाले असून मला संधिवाताचा त्रास सुरू झाला आहे.
त्याचप्रणामे पूर्वी मी दिवसाला ८ ते ९ तास सराव करायचे, पण आता माझे गुडघे एका तासातच उत्तर देतात आणि त्यांना सूज येते. जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा थांबणेच योग्य असते."
"माझ्या अटींवर जगले, माझ्या अटींवर थांबले" : निवृत्तीबाबत बोलताना सायना म्हणाली, "मी माझ्या अटींवर खेळायला सुरुवात केली होती आणि आज माझ्याच अटींवर थांबले आहे." तिने आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा २०२३ मध्ये सिंगापूर ओपनमध्ये खेळली होती.
देशाकडून सन्मान आणि कौतुक : सायनाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्कार (२००९) आणि देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१०) देऊन गौरवण्यात आले आहे. सायनाच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.