सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न १८ शाळा सुरू आहेत. त्यातील १० शाळांमधील ३६६ विद्यार्थी प्रथमच दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या दृष्टीने सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. याशिवाय काही खासगी शाळांच्या तज्ज्ञ शिक्षकांचेही विशेष सराव परीक्षेसाठी सहाय्य घेण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. तसेच एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा चार मंडळाचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळा आहेत.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेत असतो. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना त्यांच्यासाठी विशेष अभ्यास वर्ग घेणे, प्रश्नपत्रिकांचा संच सोडवून घेणे, तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन असे अनेक टप्प्यांवर महानगरपालिका शिक्षण विभाग सकारात्मक प्रयत्न करीत असते. गेली अनेक वर्षे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा उत्तम लाभ मिळत आहे आणि निकालाची टक्केवारी ९३ टक्के इतकी पोहोचली आहे.
याच अनुषंगाने आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेला जे विद्यार्थी सामोरे जाणार आहेत, त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत.
१७ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ११ मार्च २०२६ दरम्यान परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिका शाळांमधील शिक्षक या विद्यार्थ्यांकडून सराव करून घेत आहेत. गणित, विज्ञान, सामाजिक शास्र, इंग्रजी, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या विषयांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. यासोबतच काही खासगी सीबीएसई शाळांमधील तज्ज्ञ शिक्षकांचीही यासाठी मदत घेण्यात येत आहे. सदर तज्ज्ञ शिक्षकांचे उत्तरपत्रिका लिहिण्याविषयी विशेष मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.