प्रमुख महापालिकांत सत्तास्थापनेचे गणित बनले गुंतागुंतीचे
ठाण्यात ‘अडीच वर्षां’वरून तणाव
कोल्हापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगरमध्ये छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असला, तरी महापौर पदावरून अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला या महापालिकांमध्ये बहुमताची गणिते जुळवताना महायुतीतील अंतर्गत ताणतणाव, तसेच छोट्या पक्षांचे वाढते महत्त्व स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी २५ नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या मदतीने भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतो. मात्र, शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने मुंबईतील राजकीय हालचालींबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरसह जिथे जिथे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली आहे, तेथे महायुतीचाच महापौर बसवण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.
ठाणे महानगरपालिकेत मात्र वेगळीच परिस्थिती आहे. एकूण १३१ जागांपैकी बहुमतासाठी ६६ जागांची गरज असताना शिवसेनेने ७५, तर भाजपने २८ जागा जिंकल्या आहेत. एकट्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने ठाण्याचे महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावे, अशी आग्रही मागणी केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपला महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका मांडत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेतेपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. सत्तेत सन्मानजनक वाटा न मिळाल्यास ‘दुसऱ्या भूमिके’चा पर्यायही खुला असल्याचे सूचक विधान त्यांनी केल्याने ठाण्यातील सत्तासमीकरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत असले, तरी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे महापौर पदासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. शिवसेनेला ५३ आणि भाजपला ५० जागा मिळाल्या असून बहुमताचा ६२ हा आकडा दोघांनाही गाठता आलेला नाही. या निवडणुकीत उबाठाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आल्याने ठाकरे बंधूंचे हे नगरसेवक ‘गेमचेंजर’ ठरत आहेत. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा असताना, हे नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने शिवसेना आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. ७८ जागांच्या सभागृहात शिवसेना आघाडी ३६ आणि भाजप आघाडी ३७ जागांवर असून बहुमतासाठी अपक्ष आणि वंचितची मदत निर्णायक ठरली आहे.
कोल्हापूरमध्ये वेगळी गणिते
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीने प्रथमच सत्ता मिळवली आहे. ४५ जागांसह महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून त्यात भाजप २६ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेच्या १५ आणि राष्ट्रवादीच्या ४ जागांमुळे सत्ता भक्कम झाली असली, तरी महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने कोल्हापूरचा महापौर भाजपचाच असेल, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावर महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याने शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद मिळाले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली आहे. यामुळे कोल्हापूरचा महापौर कोणाचा, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे सतेज पाटील यांनी शिवसेनेशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने कोल्हापूरचे राजकारण रंजक वळणावर असल्याचे दिसते. त्याशिवाय भाजपने इचलकरंजी, सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापालिकांवर आपला महापौर बसवण्याची तयारी केली आहे.
अमरावतीत रवी राणा केंद्रस्थानी
अमरावती महापालिकेत भाजप सर्वाधिक जागा मिळवूनही थेट सत्ता स्थापनेसाठी इतरांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. येथे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्याकडे असलेला १५ सदस्यांचा गट सत्ता स्थापनेच्या गणितात केंद्रस्थानी आहे. अकोला महापालिकेतही त्रिशंकू परिस्थिती असून दोन अपक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाच्या भूमिकेवर सत्ता ठरणार आहे. एकूणच, राज्यातील प्रमुख महापालिकांत महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच केवळ बहुमतापुरती मर्यादित न राहता, महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि छोट्या पक्षांची वाढती ताकद अधोरेखित करणारी ठरत आहे.
भिवंडी, वसई-विरारमधील समीकरणे
वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सभागृहात बहुमतचाचणी सिद्ध करेपर्यंत तेथे काही वेगळ्या राजकीय घटना घडू शकतात, अशा चर्चा आहेत. पनवेलमध्ये भाजपचा महापौर विराजमान होऊ शकतो. भिवंडी निजामपूर शहर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच १२ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर बसवणे कोणत्याही गटाला शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे. भिवंडीत मनपात सत्तास्थापनेसाठी ४६ या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सध्या काँग्रेस ३०, भाजप २२, शिवसेना १२, राष्ट्रवादी १२, समाजवादी पार्टी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.