बेंगळुरू : कर्नाटक पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, राज्याचे पोलीस महासंचालक (नागरिक हक्क अंमलबजावणी) रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तातडीने निलंबित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून रामचंद्र राव यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत सिद्धरामय्या सरकारने ही कडक कारवाई केली आहे. सोमवारी सोशल मीडियावर काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या, ज्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव हे वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील कृत्ये करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे व्हिडिओ सार्वजनिक होताच कर्नाटकच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि नैतिकतेचा मुद्दा लक्षात घेऊन गृह विभागाने चौकशीचे आदेश देत राव यांना पदावरून दूर केले आहे. या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे रक्षकच अशा कृत्यांमध्ये सामील असतील, तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय शिस्त आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून आता सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असले तरी महापालिकेत पन्नास ...
"तो व्हिडिओ मी नव्हेच, माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट"
अश्लील व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याच्या आरोपावरून निलंबनाची कारवाई ओढवलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी आता आपली बाजू मांडली आहे. हे व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करत त्यांनी आपली निष्पापत्व सिद्ध करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन खळबळ उडाल्यानंतर, रामचंद्र राव यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने गृहमंत्र्यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिल्याचे समजते. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानावरून त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना रामचंद्र राव यांनी स्वतःवर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, "व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडिओ क्लिप्स पाहून मला स्वतःला मोठा धक्का बसला आहे. त्या व्हिडिओंशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणाचेही बनावट व्हिडिओ सहज तयार केले जाऊ शकतात. हा माझी सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलीन करण्याचा एक मोठा कट असू शकतो." रामचंद्र राव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने त्यांच्या दाव्यांची दखल न घेता, प्राथमिक दर्शनी पुराव्यांच्या आधारे त्यांना निलंबित केले आहे. आता सायबर पोलीस या व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करणार असून, हे व्हिडिओ खरे आहेत की 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले 'डीपफेक' आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
हा व्हिडिओ आठ वर्षे जुना!
वृत्तांनुसार, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की हे व्हिडिओ जुने असू शकतात का? आयपीएस अधिकारी रामचंद्र राव म्हणाले की, जर ते जुने असतील तर ते सुमारे आठ वर्षांपूर्वीचे असतील, जेव्हा त्यांची बेळगावी येथे नियुक्ती होती, परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की त्यांचा या व्हिडिओंशी काहीही संबंध नाही. व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ही भेट होऊ शकली नाही. सरकारने संकेत दिले आहेत की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.