वॉशिंग्टन डीसी : जागतिक महाशक्ती अशी ओळख मिरवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं दिवसागणिक अधिकाधिक धक्कादायक आणि अनपेक्षित असं होऊ लागलं आहे. एखाद्या लहान मुलानं हट्ट करावा आणि मनासारखं घडत नाही म्हणून संताप व्यक्त करावा, तसा प्रकार ट्रम्प यांनी सुरू केला आहे.
एकही पुरावा न देता आणि लढाईत गुंतलेल्या एकाही देशाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसला तरी ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक युद्ध थांबवल्याचा आणि जागतिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी मोठे योगदान दिल्याचा दावा पुन्हा एकदा केला. ट्रम्प सातत्याने हे दावे करत असले तरी त्यातील एकही दावा सिद्ध झालेला नाही. विशेष म्हणजे प्रत्येक युद्ध थांबवल्याचा दावा करताना ट्रम्प प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रयत्न करत राहिले. पण नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या समितीने ट्रम्प यांच्या नावाचा विचार पण केला नाही.
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांतता पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे मचाडो यांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या काही काळानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलात लष्करी कारवाई केली आणि अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण केले. या घटनेनंतर व्हेनेझुएलाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेचा निषेध करणे मचाडो यांनी टाळले. उलट ट्रम्प यांना हवा असल्यास शांतता पुरस्कार परस्पर हस्तांतरित करण्याची तयारी मचाडो यांनी दाखवली. यावर नाराजी व्यक्त करत नोबेल पुरस्कार समितीने दिलेला पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही असे जाहीर केले. पुरस्कार समितीने नियमांची माहिती दिली आणि ट्रम्प पुन्हा संतापले. त्यांनी नोबेल पुरस्कार समिती ज्या देशात वास्तव्यास आहे त्या नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र पाठवले. या पत्राद्वारे आता नोबेल मिळवण्याची इच्छा नाही. पण जगात कुठेही आता शांतता राखण्याची जबाबदारी अमेरिकेची नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. जे अमेरिकेच्या हिताचे आहे ते आणि तेवढेच प्राधान्याने करणार असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांचे हे पत्र म्हणजे नोबेल मिळत नसल्याचा संताप असल्याची चर्चा सुरू आहे.
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या विरोधात कारवाई केली. पण अद्याप व्हेनेझुएलातील तेल कंपन्यांवर पुरते नियंत्रण मिळवलेले नाही. आता ट्रम्प ग्रीनलँड ताब्यात घेण्यास उत्सुक आहेत. युरोपमधील अनेक देशांचा विरोध झुगात ट्रम्प ग्रीनलँड विरोधात कारवाईची तयारी करत आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा प्रयत्न इराणच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा आहे. अलिकडेच ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वाला धमकावले आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नोबेल प्रकरणी त्यांच्या नाराजीला पत्रातून वाट करुन दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या मनात आहे ती काय ? यावरुन चर्चेला उधाण आले आहे.