वसई-विरार महापालिकेत निवडले जाणार १० स्वीकृत सदस्य

महायुतीला चार, तर बविआला मिळणार सहा जागा


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ सदस्य संख्येच्या सभागृहात आणखी १० नगरसेवकांची भर पडणार आहे. स्वीकृत सदस्य निवडीबाबत असलेल्या पक्षीय संख्याबळाच्या नियमानुसार या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला ६ तर भाजप शिवसेना महायुतीला ४ स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे, तर भाजपकडून सुद्धा अशा दोन उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो. तर दोन नवीन चेहऱ्यांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात पाठविले जाणार असल्याची चर्चा होत आहे.


वसई-विरार महापालिकेच्या सदस्यांची संख्या ही ११५ आहे. स्वीकृत सदस्य निवडताना एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा १० यामध्ये जी संख्या कमी असेल तेवढे स्वीकृत सदस्य निवडले जातात. ११५ या संख्येच्या दहा टक्के म्हणजे ११.५ ही संख्या येते. त्यामुळे १० ही संख्या कमी असल्याने या महापालिकेत एकूण १० स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. तसेच राजकीय पक्षांना निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य निवडीचा कोटा ठरवून दिला जातो. बहुजन विकास आघाडीचे शिट्टी या चिन्हावर ७० नगरसेवक निवडून आले आहेत.


त्यामुळे त्यांना सहजपणे सहा स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे. भाजपचे ४३ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेला सोबत घेऊन महायुती म्हणून भाजपने ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे ४ स्वीकृत सदस्यांचा कोटा त्यांना मिळावा यासाठी आवश्यक असलेला ४४ चा ‘मॅजिक’ आकडा महायुतीकडे आहे.


दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूर, किरण ठाकूर, हार्दिक राऊत, माजी महापौर रुपेश जाधव यांच्यासह आणखी काही चर्चेतले उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे पराभूत झालेल्या दोन तीन उमेदवारांसह सभागृहात मार्गदर्शक ठरावा असा एक ज्येष्ठ सदस्य आणि दोन तरुणांना बहुजन विकास आघाडी स्वीकृत सदस्य म्हणून संधी देणार असल्याचे बोलले जात आहे, तर महायुतीकडून सुद्धा निवडणुकीत पराभव झालेल्या दोन उमेदवारांसह भाजप संघटनेतील दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराचाही विचार केला जाऊ शकतो. अशीही चर्चा होत आहे. एकंदरीतच महायुती आणि बहुजन विकास आघाडीमध्ये स्वीकृत सदस्य निवडीसाठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे.


प्रथम महापौर, मग स्वीकृत सदस्य


महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची नावे १९ जानेवारी रोजी शासनाच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध होतील. त्यानंतर बहुजन विकास आघाडी आणि महायुतीला गटनेत्यांची निवड करावी लागेल. स्वीकृत सदस्यांची नावे गटनेत्यांकडूनच विभागीय आयुक्तांकडे सादर केली जाणार. विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून संबंधित नावांची छाननी केली जाईल आणि पात्र असलेली नावे महासभेचे पीठासन अधिकारी महापौर यांच्याकडे पाठविले जातील. त्यानंतर पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची नावे महापौरांकडून जाहीर करण्यात येतील. अशा पद्धतीची सर्व प्रक्रिया स्वीकृत सदस्य निवडीसाठी राहणार असली तरी, यावेळी मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असतानाही महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे प्रथम महापौर पदासाठी निवडणूक होईल आणि त्यानंतरच स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Comments
Add Comment

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही

प्रजासत्ताक दिनापर्यंत नव्या महापौरांची निवड शक्य नाही

झेंडावंदनाचा मान मिळणार प्रशासकांनाच आगामी आठवड्यात ठरणार महापौर पदाचे आरक्षण विरार : वसई-विरार महापालिकेत

महापालिकेच्या सभागृहात भाजपचे ४० नवे चेहरे

बविआच्या २६ माजी नगरसेवकांना मतदारांची पुन्हा पसंती विरार : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता

हजारापेक्षा कमी मतांच्या फरकाने १५ उमेदवारांचा पराभव

बविआच्या १२ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा समावेश गणेश पाटील, विरार: वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या ११५

भाजप एका जागेवरून ४३ जागांवर

बहुजन विकास आघाडीच्या ३७ जागा घटल्या विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा