मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते राज पुरोहित यांचे मुंबईत शनिवारी रात्री निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज पुरोहित यांच्यावर रविवारी दुपारी एक वाजता मुंबईच्या चंदनवाडी सोनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यदर्शनासाठी पार्थिव मरिन ड्राइव्ह येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
राज पुरोहित हे दक्षिण मुंबईतले भाजपचे प्रमुख नेते होते. ते मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कामगार आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. बादेवी आणि कुलाबा येथून अनेक वेळा आमदार म्हणून काम केलेले पुरोहित हे राजस्थानी समुदायाचे एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते आणि पक्षाच्या संघटनेत ते सक्रिय होते.
माजी मंत्री आणि भाजप नेते राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित शुक्रवारी मुंबईच्या वॉर्ड क्रमांक २२१ मधून मनपा निवडणूक जिंकला. पुरोहित यांनी आधी या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून काम केले होते. मुलाने राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आणि अवघ्या काही तासांनी राज पुरोहित यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज पुरोहित यांच्या निधनाने त्यांच्या समर्थकांमध्ये, मुंबई भाजपमध्येही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी हितचिंतकांची गर्दी झाली होती. भाजपचे अनेक वरिष्ठ नेतेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत.