उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला संवाद

मुंबई : वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख राहिली पाहिजे. नागरिकांच्या मनात नगरसेवकांविषयी एकही चुकीचा विचार निर्माण होऊ नये, हाच आपल्या कामाचा खरा निकष असावा, असे त्यांनी ठासून सांगितले.


मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधत विकास, स्वच्छता, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.


यावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे हे उपस्थित होते.


शिंदे म्हणाले की, आपल्या प्रभागात लोकांना प्रत्यक्ष दिसून येईल असा बदल झाला पाहिजे. आपण केलेली कामे लोकांच्या लक्षात यायला हवीत. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे कोणतेही काम आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येक नगरसेवकाने विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


सकाळी उठून आपल्या वॉर्डमध्ये साफसफाई झाली आहे की नाही याची पाहणी करा. कुठे खड्डे पडले असतील तर तात्काळ दुरुस्ती करून घ्या. कचरा साचलेला दिसायला नको, नाल्यांमध्ये कचरा कोंडीतून अडलेला नसावा. संपूर्ण वॉर्ड चकाचक आणि स्वच्छ दिसायला हवा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘डीप क्लीन ड्राइव्ह’सारखे प्रयोग आपल्या प्रभागात राबवा आणि संपूर्ण यंत्रणा वापरून प्रभाग स्वच्छ ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.


निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करताना त्यांनी सांगितले की, यावेळी 19 ‘लाडक्या बहिणी’ विजयी झाल्या आहेत. पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता आपल्या प्रभागात शिवसेनेचे काम सुरू ठेवावे. छोट्या-मोठ्या चुकांमुळे काही उमेदवार पराभूत झाले असले तरी त्यांनी लोकांसाठी काम करत राहावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाने स्वतःच्या प्रभागासोबतच आणखी एक-दोन प्रभागांच्या विकासासाठीही पुढाकार घ्यावा. नागरिकांच्या मनात नगरसेवकांबद्दल कोणताही प्रतिकूल विचार निर्माण होऊ नये. लोकांच्या मनात विश्वास आणि सकारात्मक भावना निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.


जुन्या नगरसेवकांनी नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन करावे. निधी कसा मिळवायचा, प्रस्ताव कसे द्यायचे आणि कामांचा पाठपुरावा कसा करायचा, याची माहिती नव्या नगरसेवकांना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


गेल्या साडे तीन वर्षांत आपण केलेल्या विकासकामांमुळेच मुंबईकर नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे, असे सांगत शिंदे म्हणाले की, विरोधकांनी भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, तर आपण विकासाला प्राधान्य दिले. लोकांनी भावनिकतेला नाकारून विकासाला मतदान केले, हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे.


ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने या निवडणुकीत 90 जागा लढवल्या असून पक्षाला 32 टक्के मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणूक असो वा ग्रामपंचायत निवडणूक, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. महाराष्ट्रातील जनतेने काही पक्षांना पाचव्या क्रमांकावर ढकलले असून, जनतेच्या कोर्टात जाणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


नगरसेवक हा विकासाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, नवीन बांधकामांच्या कामात अडथळे आणू नका. छोट्या अडचणी तात्काळ सोडवा. ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) देण्याचा निर्णय घेतला असून, आपल्या प्रभागातील इमारती शोधून त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करून द्या.


पुनर्विकासासाठी अडकून पडलेल्या इमारतींच्या प्रकल्पांना गती द्या. एसआरए क्लस्टर प्रकल्प राबवले जात असून भविष्यात लाखो घरांची निर्मिती होणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन त्यांना चालना द्या. घराचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळलात तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


महिला बचत गटांसाठी नगरविकास विभागाकडून रिव्हॉल्विंग फंड दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला बचत गटांना 20 ते 30 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, ‘लाडक्या बहिणीं’ना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


प्रत्येक वॉर्डमध्ये किमान दोन ते तीन मोठी विकासकामे उभी राहिली पाहिजेत, ज्यातून नागरिकांना प्रत्यक्ष बदल जाणवेल. मार्केट, अभ्यासिका आणि दवाखाने उभारण्यावर भर द्या. लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात तेव्हा विकासकामे सुरू असल्याचे त्यांना दिसायला हवे, असेही त्यांनी सांगितले.


विरोधी पक्षांशी वाद घालण्यापेक्षा समन्वय ठेवा. गोड बोलून त्यांनाही सोबत घ्या आणि टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करा, असा सल्ला देत शिंदे यांनी सांगितले की, या निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. संपूर्ण प्रभागात टप्प्याटप्प्याने बदल झालेला दिसला पाहिजे. जे निर्णय घेतले आहेत, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन त्यांनी सर्व नगरसेवकांना केले.

Comments
Add Comment

मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत ९ रुपयात करता येणार वातानुकूलित प्रवास, जाणून घ्या... केव्हा कुठे मिळणार ही सेवा?

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर मुंबई : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर

मुंबई–नवी मुंबई प्रवास होणार अधिक स्वस्त; टोलमध्ये ५० टक्के सूट, ई-वाहनांसाठी टोल माफ

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी

वय लहान पण कीर्ती महान; पुण्यातील सई थोपटेनी नगरसेवक बनून रचला इतिहास

Pune Municipal Corporation Election 2026 : सई थोपटे या तरुणीने अतिशय लहान वयात पुणे महानगरपालिकेत मोठं यश मिळवित इतिहास रचला आहे.ती

महापौरपदासाठी पक्षांमध्ये लॉबिंग सुरू.. कोण होणार महापौर?

Municipal Corporation Election Results 2026 : मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे यांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये पारडे कोणाचे जड होणार,

मुंबईचा महापौर कोण होणार? भाजपातील 'या' पाच नावांची रंगते आहे चर्चा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आता मुंबईला वेध लागलेत ते मुंबईचा महापौर कोण होणार याचे? मुंबईची