ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि निर्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात एक अत्याधुनिक कृषी केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट विकसित करण्यात येणार असून यासाठी सुमारे ७ हेक्टर क्षेत्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
हा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ज्या ठिकाणी सरकारकडून मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे, त्या जागेवर जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या प्रकल्पाच्या माध्यमातून हब आणि टर्मिनल मार्केटची उभारले जाणार आहे. मार्केटची जमीन राज्य कृषी पणन महामंडळाला मोफत दिली जाणार असून मार्केटमध्ये शेतमालासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत
या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून जवळपास ९८ कोटी रुपयांचा आर्थिक पाठिंबा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
या कृषी केंद्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतमालाची हाताळणी होणार असून फळे, भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनांसाठी प्रक्रिया, फळे- व्हेपर हीट ट्रीटमेंट, विकिरण प्रकल्प, तसेच साठवणुकीच्या सुविधा आणि वाहतूक व्यवस्था, व्यापारी, निर्यातदार आणि शेतकरी यांना एकाच व्यासपीठावर आणून थेट व्यवहाराची संधी निर्माण केली जाणार आहे.
या केंद्रात शेतमालाच्या गुणवत्तेवर भर देण्यात येणार असून प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे, उत्पादनाचा दर्जा टिकवणे आणि जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार शेतमाल तयार करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना फायदा होणार असून कृषी निर्यातीला गती मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच या प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन परिसरातील आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.