बविआच्या १२ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा समावेश
गणेश पाटील, विरार: वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या ११५ लढतींपैकी ११० लढती ह्या महायुती आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये झाल्या. तर चार ठिकाणी उबाठा आणि एका जागेवर समाजवादी पार्टीचा उमेदवार क्रमांक दोनवर राहिला. दरम्यान, या निवडणुकीत १ हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीचे १२ तर भाजपचे ३ उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर या लढतींबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. वसई विरार महापालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुती आणि बहुजन विकास आघाडी या दोनच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढती होतील असे चित्र सुरुवातीपासूनच होते. बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत ११३ जागा लढवल्या. काँग्रेसच्या एका उमेदवारासह एका अपक्षाला पाठिंबा दिला. तर भारतीय जनता पक्षाने ८८ आणि शिवसेनेने २७ जागा लढविल्या. एकूण ११५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल ११० ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढती झाल्या. बहुजन विकास आघाडीने ७० उमेदवार निवडून आणले असून, भाजपचे सुद्धा ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला एका नगरसेवकाच्या रूपाने या ठिकाणी खाते उघडता आले आहे. दरम्यान, ५०० ते १ हजार मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीच्या १३ उमेदवारांचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हार्दिक राऊत यांना भाजपचे विजयी उमेदवार गौरव राऊत यांच्यापेक्षा ४७३ मते कमी पडली आहेत. याच प्रभागात क जागेसाठी भाजपच्या ॲड .दर्शना त्रिपाठी कोटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या ॲड .अर्चना जैन यांचा ९३९ मतांनी पराभव केला आहे. तर ड जागेसाठी पंकज ठाकूर यांना विजयश्री खेचून आणण्याकरिता भाजपच्या मेहुल शहा यांच्यापेक्षा ६३७ मते कमी पडले आहेत. प्रभाग क्रमांक सहा ड मध्ये भाजपच्या हितेश जाधव यांनी बहुजन विकास आघाडीच्या स्वप्नील पाटील यांचा ६८८ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये बहुजन विकास आघाडीच्या विजया तोरणकार यांचा भाजपच्या रितू चौबे यांनी ६७९ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपच्या तीनही जागा अशाच कमी मतांच्या फरकाने भाजपने खेचून आणल्या आहेत या प्रभागात अ जागेसाठी भाजपच्या स्मिता भूपेंद्र पाटील यांचा ५८२ मतांनी विजय झाला असून त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या शीतल चव्हाण यांचं पराभव केला आहे. ब जागेसाठी बबीता सिंह यांनी सुविधा माने यांचा ९९९ मतांनी पराभव केला आहे. तर ड जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या मनीष जोशी यांना भाजपच्या शंकर सुर्वे यांच्यापेक्षा ९३१ मते कमी पडली आहेत. प्रभाग क्रमांक १८ ब मध्ये शिवसेनेच्या हेमलता नवीन सिंह यांनी बहुजन विकास आघाडीच्या सरिता दुबे यांचा ५८३ मतांनी पराभव केला आहे. याच प्रभागातील क जागेसाठी भाजपच्या ख्याती घरत यांनी बहुजन विकास आघाडीच्या अमिता पाटील यांचा ९०५ मतांनी पराभव केला आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांना प्रभाग क्रमांक २१ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा केवळ १४२ मध्ये कमी पडल्याने त्यांचा पराभव झाला आहे. येथे भाजपचे विशाल जाधव हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २३ ब साठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती वृंदेश पाटील यांचा ५८४ मतांनी पराभव केला आहे.
भाजपच्या या उमेदवारांचा झाला कमी मतांनी पराभव
प्रभाग क्रमांक नऊ मधील ड जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या विनोद जाधव यांनी भाजपच्या कमलेश खटावकर यांचा केवळ ४३९ मतांनी पराभव केला आहे. याच प्रभागात बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख यांनी भाजपचे विश्वास सावंत यांचा एक हजार ३२ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक २१ क या जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या काजल गोपाळे ह्या भाजपच्या उमेदवार पूनम बिद्लन यांच्यापेक्षा फक्त ९१ मध्ये जास्त घेऊन विजयी झाल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २४ ब जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांनी भाजपच्या स्मिता डीकोस्टा यांचा ५९७ मतांनी पराभव केला आहे.